Jalgaon crime 
जळगाव

Jalgaon crime news | 'रामू, माझी स्टोरी इन्स्टावर टाक...' प्राचार्याच्या जाचाला कंटाळून १९ वर्षीय तरुणाने जीवन संपवले

या घटनेनंतर जळगावच्या शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, दोषी प्राचार्याविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जळगाव शहरात शिक्षणासाठी आलेल्या एका १९ वर्षीय उमद्या तरुणाने प्राचार्याच्या जाचाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. “रामू, माझी स्टोरी इन्स्टावर टाक,” असे हृदयद्रावक आवाहन करत बोदवड येथील श्याम प्रभाकर पाटील याने मृत्यूला कवटाळले. या घटनेनंतर जळगावच्या शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, दोषी प्राचार्याविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे.

नेमकं प्रकरण काय?

देवकर कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये द्वितीय वर्षात शिकणारा श्याम पाटील नेहरू नगर परिसरातील एका भाड्याच्या खोलीत राहत होता. रविवारी (१५ फेब्रुवारी) संध्याकाळी त्याचे रूममेट गावाला गेले असताना, एकटेपणाचा आणि मानसिक नैराश्याचा आधार घेत श्यामने गळफास लावून आत्महत्या केली. संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये त्याने महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

सुसाईड नोटमधील तो ‘काळजाला भिडणारा’ मजकूर श्यामने लिहिलेल्या चिठ्ठीतील शब्द कोणत्याही संवेदनशील व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आणतील असे आहेत. त्याने नमूद केले की, “माझी कोणतीही चूक नसताना प्राचार्यांनी मला सर्व शिक्षक आणि मित्रांसमोर अपमानित केले. मित्रांच्या भांडणात केवळ मध्यस्थी करायला गेलो, तरीही प्राचार्यांनी मला पीव्हीसी पाईपने बेदम मारहाण केली आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. गुरु मारतात हे माहित होते, पण इतके निर्दयीपणे नाही मारत.” चिठ्ठीच्या शेवटी आपल्या मित्राला उद्देशून त्याने केलेली, “रामू, मी गेल्यानंतर माझी स्टोरी इन्स्टावर टाक,” ही विनंती सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहे.

पालकांचा आक्रमक पवित्रा

‘आधी अटक करा, मगच मृतदेह नेऊ’ या घटनेची माहिती मिळताच जळगाव शासकीय रुग्णालयात नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. जोपर्यंत प्राचार्य योगेश पवार आणि संबंधित दोषींवर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी ठाम भूमिका श्यामच्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी घेतली आहे. एक शेतकरी कुटुंब आपल्या मुलाला मोठ्या आशेने शिक्षणासाठी शहरात पाठवते, मात्र तिथे शिक्षकाच्याच अमानुष वागणुकीमुळे त्याचा बळी जातो, याबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पोलीस तपास आणि कारवाई

रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळावरून सुसाईड नोट जप्त केली असून सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अजित पाटील करत आहेत. आता पोलीस या चिठ्ठीच्या आधारे प्राचार्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

दोषींना बेड्या कधी ठोकणार ?

शिक्षण संस्था ही ज्ञानाचे मंदिर असते, पण तिथेच जर विद्यार्थ्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ होत असेल, तर पालकांनी आपल्या पाल्यांना कोणाच्या भरवशावर पाठवायचे? असा जळजळीत प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT