जळगाव : जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थिर सर्वेक्षण पथकाने पहिली मोठी कारवाई करत दोन लाख 56 हजार रुपयांची रोकड जप्त केली. ही कारवाई रावेर तालुक्यातील सावदा रोडवरील शासकीय विश्रामगृहासमोर गुरुवारी (दि.13) झाली.
निवडणुकीचा आचारसंहिता कालावधी सुरू झाल्याने जिल्ह्यातील 18 नगरपालिकांसाठी प्रत्येक तालुक्यात स्थिर सर्वेक्षण पथके तैनात आहेत. रावेर तालुक्यातील बऱ्हाणपूर–अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर वाहन तपासणी सुरू असताना एमएच 19 सीएफ 2385 या क्रमांकाच्या वाहनाची तपासणी करण्यात आली. वाहनामध्ये दोन लाख 56 हजारांची रोख रक्कम आढळली.
वाहनधारक कुशल सुनील अग्रवाल (रा. वरणगाव रोड, भुसावळ) यांनी ही रक्कम बऱ्हाणपूर येथे सोयाबीन खरेदीसाठी नेत असल्याचे सांगितले. मात्र त्याबाबत कोणतेही दस्तऐवज सादर करू शकले नाहीत. त्यामुळे पथकाकडून पंचनामा करून रोकड जप्त करण्यात आली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार बंडू कापसे आणि पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या उपस्थितीत करण्यात आली. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सतीश पुदाके यांनी सीलबंद रक्कम जिल्हा कोषागारात जमा केली आहे.