जळगाव: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात ‘कॉपीमुक्त अभियान’ प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ड्रोन कॅमेरे, लाईव्ह स्ट्रीमिंग, भरारी पथके व कडक पोलिस बंदोबस्त यांचा वापर करण्यात येणार आहे.
राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनंतर आज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा दक्षता समितीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत परीक्षेच्या सुरळीत व पारदर्शक आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, पोलीस अधीक्षक . महेश रेड्डी (व्हीसीद्वारे), महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रतिनिधी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य प्रतिनिधी श्रीमती भावसार, सदस्य सचिव शिक्षणाधिकारी श्रीमती कल्पना चव्हाण यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
इयत्ता १२ वीची परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ दरम्यान, तर इयत्ता १० वीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत होणार आहे. जळगाव जिल्ह्यात इयत्ता १० वीच्या परीक्षेसाठी १४७ परीक्षा केंद्रांवर एकूण ५९ हजार ४२० विद्यार्थी प्रविष्ट झाले असून, त्यामध्ये ३३ हजार ६५३ मुले व २५ हजार ७६७ मुली आहेत. तर इयत्ता १२ वीच्या परीक्षेसाठी ८२ परीक्षा केंद्रांवर एकूण ४८ हजार २३२ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. त्यामध्ये विज्ञान शाखेचे २६ हजार ८८४, कला शाखेचे १५ हजार ५१४, वाणिज्य शाखेचे ४ हजार ८११ विद्यार्थी असून, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ९७८ तर आयटीआय अभ्यासक्रमासाठी ४५ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत.
संवेदनशील व उपद्रवी परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे देखरेख ठेवण्यात येणार असून, परीक्षा केंद्राबाहेर व्हिडिओ चित्रीकरण केले जाणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर वर्गातील पर्यवेक्षक मोबाईलद्वारे झूम मीटिंगच्या माध्यमातून जिल्हा नियंत्रण कक्षाशी जोडले जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येक वर्गावर थेट नजर ठेवता येणार आहे. नाशिक विभागीय मंडळाची ९ भरारी पथके तसेच जिल्हास्तरीय विशेष भरारी व बैठी पथके परीक्षा केंद्रांना आकस्मिक भेटी देतील. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार करणाऱ्या किंवा त्यांना मदत करणाऱ्यांविरुद्ध दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्राच्या ५०० मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्यात येणार आहेत. परीक्षा काळात अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करण्याची जबाबदारी महावितरणकडे सोपविण्यात आली आहे. तसेच बाह्य उपद्रव टाळण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात राहणार आहे. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त व पारदर्शक वातावरणात परीक्षा द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. बैठकीस उपशिक्षणाधिकारी . रागिणी चव्हाण व फिरोज पठाण हेही उपस्थित होते.