जळगाव : अज्ञात भरधाव वाहनाने पाठिमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील मामा भाच्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज (दि.२०) पहाटे तीनच्या सुमारास पाचोरा शहरातील भडगाव रोडवर झाला. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर राठोड (वय ३६) व संकेत राठोड (वय १९, दोन्ही रा. चंडिकावाडी ता. चाळीसगाव) अशी मृतांची नावे आहेत.
ज्ञानेश्वर राठोड हे आज (सोमवारी) पहाटे तीनच्या सुमारास आपल्या भाच्याला घेऊन चाळीसगाव येथील चंडिकावाडी तांडा या गावाच्या दिशेने निघाले होते. ते भडगाव रोडवरील निर्मल सीड्स कंपनीसमोर आले असता त्यांच्या वाहनाला एका भरधाव अज्ञात वाहनाने पाठिमागून जोराची धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले . त्यांना डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी पुढील तपास पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय दिनेश भदाणे हे करीत आहेत.