जळगाव

खाकीतली माणुसकी! जळगाव पोलीस अधीक्षकांचा थेट कर्मचाऱ्याच्या घरी दौरा

पोलीस लाईनमधील अंधार दूर; पीडब्लूडीला झापून कामाला लावले; कर्मचाऱ्यांच्या परिवाराला मिळाला मोठा दिलासा

पुढारी वृत्तसेवा

जळगाव: २४ तास जनतेच्या सुरक्षेसाठी अहोरात्र राबणाऱ्या पोलिसांचे घर अन् तिथले वास्तव काय? याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी काल थेट पोलीस वसाहतीत रात्री अचानक धडक दिली. एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी पोहोचत त्यांनी केवळ चौकशीच केली नाही, तर तिथल्या समस्यांचा निपटारा करत 'पालकाची' भूमिका समर्थपणे बजावली.

पोलीस कर्मचारी म्हणजे कायद्याचे रक्षक. गुन्हा घडला की मागावर असलेला आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र डोळ्यांत तेल घालून जगणारा हा घटक. एका पायावर पोलीस स्टेशन तर दुसऱ्या पायावर घर, अशी या कर्मचाऱ्यांची धडपड सुरू असते. पण, जेव्हा हा कर्मचारी कर्तव्यावर असतो, तेव्हा त्याच्या घराची आणि तिथल्या समस्यांची दखल घेणारा कोणी आहे का? हा प्रश्न उपस्थित होत असतानाच, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी थेट 'फिल्ड'वर उतरून वास्तव जाणून घेतले.

सायंकाळची वेळ होती. अधीक्षक धिवरे यांनी एका पोलीस अमलदाराच्या घरी अचानक भेट दिली. तिथे पोहचल्यावर त्यांना घराबाहेरचा भीषण अंधार आणि लाइटची समस्या दिसून आली. केवळ इतकेच नव्हे, तर घराची दुरवस्था आणि प्लास्टरिंगचा प्रश्नही समोर आला. कर्मचाऱ्याच्या पत्नीने मांडलेल्या या व्यथा ऐकून धिवरे यांनी तत्काळ कृती केली.

त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरला फोन लावला. 'अधिकारी कर्तव्य आणि शिस्त लावतात, पण कर्मचाऱ्यांच्या घराची आणि त्यांच्या परिवाराची काळजी घेणे ही आमचीच नैतिक जबाबदारी आहे,' हे ठणकावून सांगत, त्यांनी तत्काळ दुरुस्तीचे आदेश दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT