जळगाव : शहरातील मुख्य रस्त्यांवर सुरू असलेल्या अतिक्रमण मोहिमेचा प्रचंड भडका थेट महापालिकेच्या आवारात उडाला आहे. अतिक्रमण निर्मूलन पथकाने सामान जप्त केल्याच्या रागातून एका रसवंती चालकाने चक्क महापौर दीपमाला काळे यांच्या वाहनावर काठीने हल्ला चढवून तोडफोड केली. मनपाच्या आवारातच घडलेल्या या खळबळजनक प्रकारामुळे सुरक्षा व्यवस्थेचे तीन-तेरा वाजल्याचे स्पष्ट झाले असून, याप्रकरणी संबंधितावर तातडीने गुन्हा दाखल करण्याचे निर्देश महापौरांनी आयुक्तांना दिले आहेत.
जळगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून मुख्य रस्त्यांवरील बेकायदा दुकाने, टपऱ्या आणि हातगाड्यांवर धडक कारवाई सुरू आहे. गुरुवारी मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवताना पथकाने 'जय श्रीराम रसवंती'वर कारवाई केली. पथकाने नियमानुसार या रसवंतीचे साहित्य आणि यंत्रसामग्री जप्त करून मनपाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये आणली.
आपली मशिनरी जप्त झाल्याचे समजताच रसवंती चालक संतापाच्या भरात थेट महापालिकेत धडकला. मनपा आवारात येऊन त्याने प्रथम आरडाओरड करत प्रचंड गोंधळ घातला. संतापाचा पारा चढलेल्या या चालकाने दांडक्याने थेट आवारात उभ्या असलेल्या महापौरांच्या वाहनावर प्रहार केले. यामध्ये महापौरांच्या गाडीचे नुकसान झाले. दिवसाढवळ्या आणि मनपा मुख्यालयाच्या आवारात घडलेल्या या प्रकाराने अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांमध्ये एकच धावपळ उडाली.
सुरक्षारक्षक कुंपण खातात की काय? महापौरांचा संताप
आपल्याच गाडीवर हल्ला झाल्याचे समजताच महापौर दीपमाला काळे यांनी अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला. एक इसम थेट महापालिकेत घुसून तोडफोड करतो, तोपर्यंत सुरक्षा रक्षक झोपा काढत होते का? असा संतप्त सवाल करत महापौरांनी सुरक्षा आणि अतिक्रमण विभागाची चांगलीच खरडपट्टी काढली. महापालिकेच्या सुरक्षेबाबत गंभीर निष्काळजीपणा समोर आल्याने महापौरांनी मनपा आयुक्तांना या हल्लेखोरावर तात्काळ पोलिसांत कठोर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे मनपा वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.