ठाकरे गटाचे तीन माजी महापौर, विरोधी पक्षनेते आणि अन्य महत्त्वाच्या नगरसेवकांनी शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला. 
जळगाव

जळगाव महापालिकेच्या राजकारणाला कलाटणी! ठाकरे गटाचे तीन माजी महापौर, विरोधी पक्षनेते भाजपच्या गोटात

Jalgaon politics : महानगरपालिकेत 'महायुती'चाच झेंडा फडकेल', गिरीश महाजन यांचा निर्धार

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजप नेते नामदार गिरीश महाजन यांनी मोठी राजकीय खेळी केली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाचे तीन माजी महापौर, विरोधी पक्षनेते आणि अन्य महत्त्वाच्या नगरसेवकांनी शुक्रवारी (दि.३१) अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने बोलताना, महाजन यांनी जळगाव महापालिकेत 'महायुती'च्या माध्यमातूनच निवडणूक लढवली जाईल आणि सर्वाधिक जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला.

सत्तापालट करणारेच गेले भाजपात

जळगाव महापालिकेच्या राजकारणात काही वर्षांपूर्वी उबाठा गटाच्या नगरसेवकांनी अनपेक्षितपणे सत्तापालट घडवून आणला होता. मात्र, आता त्याच गटातील महत्त्वाचे चेहरे भाजपमध्ये परतल्याने उबाठा गटाला मोठा झटका बसला आहे.

भाजपात प्रवेश केलेले प्रमुख नेते: माजी महापौर: नितीन लढ्ढा, जयश्री महाजन, विरोधी पक्षनेते सुनील महाजन.

इतर महत्त्वाचे नगरसेवक/कार्यकर्ते: इक्बाल पीरजादे, नितीन बरडे, प्रशांत नाईक, चेतन शिरसाट, श्रीधर श्रीमाळ, तेजस श्रीमाळ, साधना श्रीमाळ, हर्ष चांगले, नितीन बर्डे, जाकीर पठाण, फिरोज पठाण, संगीता दांडेकर, संदेश भोईटे, हेमलता नाईक, जितेंद्र मुंदडा, वर्षा खडसे, डी. डी. वाणी आणि गौरव शिरसाळे यांचा समावेश आहे. यावेळी नामदार गिरीश महाजन आणि आमदार सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.

महाजन यांचा 'मिशन जळगाव'चा निर्धार

पत्रकारांशी बोलताना नामदार गिरीश महाजन यांनी आगामी निवडणुकीचे स्पष्ट संकेत दिले. ते म्हणाले, "राज्यात सर्वाधिक जागा जळगाव महानगरपालिकेमध्ये निवडून आणायच्या आहेत. याबाबत पालकमंत्री आणि अन्य नेत्यांशी चर्चा झाली आहे. जळगावमध्ये महायुतीच्या माध्यमातूनच निवडणूक लढवली जाईल. ते पुढे म्हणाले, "गेल्या वेळेस पेक्षाही अधिक जागा महायुतीच्या आणायच्या आहेत आणि त्यामध्ये सर्वाधिक जागा भाजपच्या असतील, यासाठी कार्यकर्त्यांनी जुने वाद विसरून पक्षाला पहिल्या स्थानावर आणण्यासाठी काम करावे." यावेळी त्यांनी जळगाव महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांची युती राहील, असे स्पष्ट केले. मात्र, महायुतीतील महत्त्वाचा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा उल्लेख करणे टाळले. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

कार्यालयात गोंधळ, कार्यकर्त्यांची नाराजी

या महत्त्वाच्या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी कार्यालयात दुपारी ४ वाजल्यापासूनच कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमण्यास सुरुवात झाली होती. मात्र, गिरीश महाजन यांना पोहोचायला उशीर झाल्याने कार्यकर्त्यांना तब्बल दोन तास ताटकळत राहावे लागले. महाजन यांच्या स्वागतासाठी ढोल-ताशे आणि फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. परंतु, गर्दीच्या व्यवस्थापनाअभावी संपूर्ण प्रवेश सोहळा उभ्या-उभ्याने आणि घाईगर्दीत पार पडला. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकच गोंधळ उडाल्याचे चित्र दिसून आले, तसेच काही कार्यकर्त्यांनी वेळेअभावी नाराजी व्यक्त केल्याचेही बोलले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT