जळगाव : तरसोद ते पाळधी या बायपासचे काम वाहतूक सुरळीत व सुरक्षित व्हावी या उद्देशाने सुरू करण्यात आले. सध्या या रस्त्यावरून वाहतूक सुरू असली तरी काम पूर्ण झालेले नाही. विशेषतः सर्विस रोड खड्डेमय झाल्याने वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
लहान वाहनांना व दुचाकीधारकांना खड्ड्यांमुळे धोकादायक परिस्थितीचा सामना करावा लागत असून, पावसाळ्यात धोकादायक खड्ड्यात पाणी साचल्याने परिस्थिती अधिकच गंभीर होत आहे. येथील मार्गावर प्रकाशयोजनेची देखील कोणतीही व्यवस्था केलेली नसल्याने रात्रीअपरात्री अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढतो आहे. महामार्गावरून थेट वाहने येत असल्याने सर्विस रोडवरून महामार्गावर चढणाऱ्या वाहनांना सतत अपघाताचा संभाव्य धोका असतो.
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण केल्यानंतर जळगाव शहरातील जडवाहतूक कमी करण्यासाठी पारधी–तरसोद बायपास रस्ता उभारण्यात आला. मात्र या रस्त्यावरील पुलाचे काम अद्याप सुरूच आहे. दरम्यान, सर्विस रोड पूर्ण न झाल्यामुळे धूळ, खड्डे आणि दिव्यांचा अभाव यामुळे वाहनधारकांना हैराणीला सामोरे जावे लागत आहे.
शहरातील वाहतुकीसाठी एकतर्फी वाहतूक सुरू केली आहे. मात्र, निधीअभावी सर्विस रोडचे काम प्रलंबित आहे. हे काम ऍग्रो इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे असून, कंपनीचे अधिकारी निधी व्यवस्थेसाठी दिल्लीला गेले आहेत. निधी उपलब्ध होताच काम पुन्हा सुरू करण्यात येईलदिग्विजय पाटील, अभियंता, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NAHI)