जळगाव : गोरगरीबांच्या मुलांसाठी असलेल्या पोषण आहार योजनेत भ्रष्टाचार सुरू आहे की काय अशी शंका येणारी घटना एरंडोल तालुक्यात समोर आली आहे. खडके खुर्द येथील महेंद्रसिंग धरमसिंग पाटील माध्यमिक शाळेतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ पोषण आहारासाठी आणलेले तांदूळ काही महिला शाळेबाहेर नेत असल्याचे दिसत आहे. या व्हायरल व्हिडिओवर प्रशासनाने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओत असे दिसते की, दोन महिला पोषण आहाराचे धान्य शाळेबाहेर नेत आहेत. व्हिडिओ रेकॉर्ड करणारी व्यक्तीने त्या महिलांना हटकले असता संबंधित महिला माघारी जातात आणि धान्य पुन्हा शाळेत नेवून ठेवतात. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक करत आहे.
पोषण आहाराच्या विक्रीचे रॅकेट?
महेंद्रसिंग धरमसिंग पाटील माध्यमिक विद्यालयात पोषण आहाराचे साहित्य बऱ्याच दिवसांपासून परस्पर लंपास केले जात असल्याचा संशय आहे. मात्र, याची जबाबदारी असलेले अधिकारी आणि कर्मचारी अशा घटनांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी, आहारासाठी आणलेल्या धान्याची विक्री होत असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक करत आहेत.