जळगाव : "माझ्यासह माझी मुलेही याच शाळेत शिकलेली आहेत, हे सांगताना मला अभिमान वाटतो. शाळेचा पहिला दिवस फक्त वह्या-पुस्तकांचा नसतो, तर तो नव्या स्वप्नांचा शुभारंभ असतो. शाळा म्हणजे शिक्षणाचे केंद्रच नव्हे तर संस्कारांची पाठशाळा आहे. शिक्षक, पालक आणि अधिकारी यांच्यातील समन्वयातूनच विद्यार्थ्यांमध्ये स्वाभिमान रुजतो. शिक्षणाच्या प्रवासाला मातीचा गंध असतो... आणि त्या गंधातच खरी समृद्धी असते," अशा शब्दांत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवार (दि.16) रोजी आज जिल्हा परिषद केंद्र शाळा, पाळधी येथे इयत्ता पहिलीत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे बैलगाडीतून आगमन करत ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि पुष्पवृष्टीत स्वागत केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या हातात हात घालून शाळेत प्रवेश केला आणि पहिलीच्या वर्गाचे उद्घाटन विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत केले. जुन्या शाळेतील आठवणींना त्यांनी स्नेहपूर्वक उजाळा दिला आणि दोन तास विद्यार्थ्यांमध्ये रमून त्यांना जीवनदृष्टीचे बळ दिले.
बैलगाडीतून आगमन – शिक्षणाच्या प्रवासाला ग्रामीण मातीचा गंध देणारा आगळा उपक्रम
स्वागत व भेटवस्तू – पहिलीतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश, बूट, दप्तर, गुलाब पुष्प व चॉकलेट वाटप
प्रेरणादायी संवाद – पालकमंत्र्यांची विद्यार्थ्यांमध्ये उत्स्फूर्त उपस्थिती
वर्गाचे उद्घाटन – विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत नव्या पर्वाला सुरुवात
वह्या वाटपाचा शुभारंभ – पालकमंत्र्यांच्या हस्ते दीड लाख वह्यांचे वितरण
कार्यक्रमाच्या प्रारंभाला विद्यार्थिनींच्या स्वागतगीताने रंगत आणली. पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन झाले. गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले यांनी नवीन शैक्षणिक धोरणाबाबत माहिती देत जबाबदारीची जाणीव करून दिली. केंद्रप्रमुख प्रमोद सोनवणे यांनी सांगितले की, नवीन सीबीएसई अभ्यासक्रमावर आधारित इयत्ता पहिलीचा वर्ग सुरू झाला असून ही शाळा एक मॉडेल शाळा म्हणून विकसित होत आहे.
उपशिक्षक झाकीर आणि उपशिक्षिका ज्योती राणे यांनी सूत्रसंचालन केले. सरपंच विजय पाटील आणि मुख्याध्यापक एन. के. देशमुख यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी योगदान दिले.
माजी सभापती मुकुंदजी नन्नवरे, सरपंच विजय पाटील, गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले, प्रकल्प अधिकारी सुरेखा तायडे, उपसरपंच वंदना साळुंखे, मच्छिंद्र कोळी, सरपंच संघटनेचे अध्यक्ष सचिन पवार, माजी सरपंच आलिम देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीकृष्ण साळुंखे, निसार देशमुख, यासीन हाजी, जमील बेग, व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय महाजन, सुनील झंवर, केंद्रप्रमुख प्रमोद सोनवणे, ग्रामविकास अधिकारी शरद धनगर, सुलतान पठाण तसेच तीनही शाळांचे मुख्याध्यापक – एन. के. देशमुख, अकिल सर, पटेल जहाआरा, मधु साळुंखे, अकबर शेख, शिक्षक, पालक, अंगणवाडी सेविका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.