Jalgaon Saw Mill Plywood Shop Fire
जळगाव: शहरातील बेंडाळे चौकात असलेल्या चंद्रिका सॉ मिल व प्लायवूडच्या दुकानाला आज (दि.२६) दुपारी बाराच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत ५० ते ६० लाखांचे नुकसान झालेले आहे. अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे प्रयत्न मुसळधार पावसातही सुरू आहेत.
जळगाव शहरातील बेंडाळे चौकात असलेल्या चंद्रिका सॉ मिलला आज दुपारी 12.10 मिनिटांच्या सुमारास अचानक आग लागली. यावेळी जोरदार मुसळधार पाऊस सुरू असतानाही आगीने रौद्ररूप घेतले. जळगाव अग्निशमन दलाचे बंबांना पाचारण करण्यात आले. मात्र, आग आटोक्यात येत नसल्याने जिल्ह्यातील इतर ठिकाणाहूनही बंबांना पाचारण करण्यात आले होते.
मात्र, गेल्या दोन तासांपासून आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दल व नागरिक प्रयत्न करीत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत दहा ते बारा अग्निशमन दलाचे बंब आग विझविण्यासाठी घटनास्थळावर दाखल झालेले आहेत. पोलीस यंत्रणा दाखल झालेली आहे. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नसले, तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.