Robbery  Pudhari
जळगाव

Jalgaon Robbery | जळगाव जिल्ह्यात घरफोडीचा धुमाकूळ! चोपडा - भुसावळात लाखो रुपयांचा ऐवज लंपास; मुख्याध्यापकाचे घर भरदिवसा लुटले

सिमेंटची भिंत फोडून आणि कुलूप तोडून चोरट्यांकडून एकूण १७ लाख ४३ हजारांची लूट,

पुढारी वृत्तसेवा

जळगाव: जिल्ह्यात चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून चोपडा ग्रामीण आणि भुसावळ शहर परिसरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी धाडसी घरफोडीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. अज्ञात चोरट्यांनी कुठे घराची सिमेंटची भिंत फोडून, तर कुठे भरदिवसा कुलूप तोडून तब्बल १७ लाख ४३ हजार ८७५ रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केली आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

चोपड्यात सिमेंटची भिंत फोडून ६० हजारांची लूट!

चोपडा तालुक्यातील घोडगाव येथील सुनील रामकृष्ण कोळी यांच्या राहत्या घरी ३० मे रोजी रात्री १.०० ते सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने कोळी यांच्या घराच्या मागील सिमेंटची भिंत फोडून आत प्रवेश केला. चोरट्याने घरातील लाकडी दरवाजाचा कडीकोंडा उघडून पत्री पेटीतील स्टीलच्या बॉक्समधून ४ ग्रॅम सोन्याच्या कानातल्या बाह्या , ४ ग्रॅम सोन्याचे मणीमंगळसूत्र, ५ हजारांचे चांदीचे देव आणि ५ हजार रुपयांची रोकड असा एकूण ६० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. दागिन्यांसह बँकेचे चेक आणि कोर्टाचे महत्त्वाचे कागदपत्रेही चोरट्याने लांबवले आहेत. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास पोहेकॉ हेमंत कोळी करत आहेत.

भुसावळात बंद घराचे कुलूप तोडून ५० हजारांवर डल्ला!

भुसावळ येथील गोकुळ नगर पुजा कॉम्प्लेक्समधील विनोद भगवान तायडे यांच्या घरात २९ मे ते १ जून २०२६ च्या दरम्यान तायडे हे बाहेर गेलेले असताना घर बंद असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप आणि कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेली ५ ग्रॅमची सोन्याची पोत, सोन्याच्या कानातल्या बाह्या आणि चांदीची चैन, गोफ, वाडे, पायल असा एकूण ४९ हजार ८७५ रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोहेकॉ हरिष शेळके तपास करत आहेत.

मिरची ग्राउंड परिसरात मुख्याध्यापकाचे घर भरदिवसा लुटले; १६.३४ लाखांची चोरी

भुसावळ येथील म्हाडा कॉलनी, वांजोळा रोड मिरची ग्राउंड जवळ, मुख्याध्यापक सुरेश नारायण शिंदे (वय ५५) यांच्या घरी ३१ मे रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १.२० वाजेच्या दरम्यान हे घराबाहेर गेले असता, घराचे कुलूप तोडले. चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर फोडून तब्बल १६ लाख ३४ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केली.

यामध्ये सोन्याच्या ४ बांगड्या सोन्याचे मंगळसूत्र २ सोन्याच्या चैन, सोन्याचे पेंडल, कानातले, मिनी मंगळसूत्र, अंगठ्या आणि चांदीचे पायल यासह रोकडचा समावेश आहे. भरदिवसा झालेल्या या मोठ्या घरफोडीमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोहेकॉ विजय नेरकर तपास करत आहेत. एकाच दिवशी समोर आलेल्या या तिन्ही घटनांमुळे जळगाव जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चोरट्यांनी पोलिसांच्या गस्तीला थेट आव्हान दिले असून, गुन्हे शोध पथक आणि स्थानिक पोलीस आरोपींच्या शोधासाठी रवाना झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT