Jalgaon Road Accident Statistics
नरेंद्र पाटील
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, यंदाच्या अवघ्या सात महिन्यांत ५२८ अपघातांमध्ये ३१० जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी (२०२५) संपूर्ण वर्षभरात ९३९ अपघातांत ४८७ जणांचा मृत्यू झाला होता. यावरून जिल्ह्यातील रस्ते सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनल्याचे स्पष्ट होत आहे.
जानेवारी ते जुलै २०२६ या कालावधीत राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग तसेच ग्रामीण व शहरी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अपघात घडले आहेत. विशेष म्हणजे शहर आणि ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांवर सर्वाधिक अपघात व मृत्यूची नोंद झाली आहे.
२०२५ मध्ये राष्ट्रीय महामार्गांवर ३२८ अपघात झाले असून त्यात २१० जणांचा मृत्यू झाला होता. तर २०२६ च्या पहिल्या सात महिन्यांत १६१ अपघातांत ९४ जणांचा जीव गेला आहे.
राज्य महामार्गांवर २०२५ मध्ये २०२ अपघातांत ११६ जणांचा मृत्यू झाला होता. यंदा जानेवारी ते जुलैदरम्यान ११३ अपघातांमध्ये ६९ जणांचा मृत्यू झाला आहे.
ग्रामीण व शहरी अंतर्गत रस्त्यांवर परिस्थिती अधिक गंभीर असून, २०२५ मध्ये ४०९ अपघातांत १६१ जणांचा मृत्यू झाला होता. तर २०२६ च्या पहिल्या सात महिन्यांतच २५४ अपघातांत तब्बल १४७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
एकूणच, २०२५ मध्ये ९३९ अपघातांत ४८७ जणांचा मृत्यू झाला होता, तर २०२६ मध्ये जुलैअखेरपर्यंत ५२८ अपघातांमध्ये ३१० जणांनी प्राण गमावले आहेत.
यंदाच्या आकडेवारीनुसार शहर व ग्रामीण भागातील रस्त्यांवर सर्वाधिक २५४ अपघात झाले असून त्यात १४७ जणांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय महामार्गांवर १६१ अपघातांत ९४, तर राज्य महामार्गांवर ११३ अपघातांत ६९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे केवळ महामार्गच नव्हे, तर अंतर्गत रस्त्यांची सुरक्षितताही गंभीर प्रश्न बनली आहे.
रस्त्यांवरील खड्डे, रखडलेली दुरुस्ती, वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी आणि वाढती वाहनसंख्या यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. रस्ते सुरक्षेसाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांनी सांगितले की, शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये तसेच राष्ट्रीय व राज्य महामार्गांच्या शहरातून जाणाऱ्या भागात वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मात्र राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित यंत्रणांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ते दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण होत नसल्याने अपघातांचा धोका वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.
राष्ट्रीय महामार्ग शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सदाशिव यांनी सांगितले की, सुमारे १५१ किलोमीटरचा महामार्ग परिसर त्यांच्या कार्यक्षेत्रात असून त्या भागात नियमित गस्त व आवश्यक ठिकाणी पथके तैनात केली जातात. तसेच जिल्हा नियोजन व विकास समिती (DPDC)च्या माध्यमातून लवकरच नवीन वाहन उपलब्ध होणार असून त्यामुळे गस्त आणि आपत्कालीन प्रतिसाद अधिक प्रभावी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.