Erandol Crime Case Pudhari
जळगाव

Erandol Crime: 14 वर्षाच्या मुलाच्या हत्येचे गूढ अखेर उकलले, क्षुल्लक कारणावरून परप्रांतीय शेतमजुरांनी केला खून

Ringangaon Latest News: 16 जून रोजी अपहरण करुन झाला होता खून | घटनेमुळे गावात उडाली खळबळ, ग्रामस्‍थांचा रास्‍ता रोको

पुढारी वृत्तसेवा

Erandol Crime News

जळगाव : एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे १४ वर्षीय तेजस गजानन महाजन या बालकाचा खून करून पळून गेलेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. १६ जून रोजी तेजसच्या अपहरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर त्याचा मृतदेह गळ्यावर धारदार शस्त्राने वार केलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आणि ग्रामस्थांनी रास्ता रोको करत तातडीने तपास करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पोलीसांनी तपासाची गती वाढविल्यानंतर दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. (jalgoan crime)

एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील गजानन नामदेव महाजन (वय ४५) यांनी १६ जून रोजी एरंडोल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली की, त्यांचा १४ वर्षांचा मुलगा तेजस गजानन महाजन याला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने घरातून पळवून नेले आहे. या तक्रारीवरून एरंडोल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन, पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी तातडीने शोधमोहीम राबवली. गावाबाहेरील रिंगणगाव - खर्चे रोडलगतच्या पडक्या शेतात एका काटेरी झुडपात तेजसचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची पाहणी केली असता, त्याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याला ठार मारल्याचे निष्पन्न झाले.

आरोपींना शोधण्याची मागणी केली होती. आरोपींनी खुनादरम्यान कोणताही पुरावा मागे न ठेवल्याने आणि कोणीही पाहिले नसल्याने पोलिसांसमोर आरोपी शोधण्याचे मोठे आव्हान उभे राहिले होते. गुन्ह्याचे स्वरूप पाहता, पोलीस अधीक्षक. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन एरंडोल पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना आरोपी शोधाबाबत मार्गदर्शन केले.

पथकाने तेजसचा मृतदेह सापडलेल्या शेतात जाऊन पुन्हा माग काढला. मृतदेहापासून ५० फूट अंतरावर राहणाऱ्या मध्यप्रदेशातील खरगोन परिसरातून शेतीकामासाठी आलेल्या काही कुटुंबांकडे चौकशी सुरू केली. चौकशीअंती त्यांना माहिती मिळाली की, तेथे राहणारे हरदास वास्कले (रा. नांदीया, ता. भगवानपुरा, जि. खरगोन, मध्यप्रदेश) हा पत्नी समिता आणि मुलांसोबत तसेच त्याच्या बाजूला राहणारा सुरेश खरते (रा. धोपा, ता. झिरण्या, जि. खरगोन, मध्यप्रदेश) हे एका नातेवाईकाच्या लग्नासाठी सकाळीच मोटारसायकलवरून रवाना झाले आहेत. पेरणीचे दिवस असताना मालकांना न सांगता हे संशयित निघून गेल्याने पोलिसांचा त्यांच्यावरील संशय बळावला.

आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथके रवाना केली. पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमणुकीस असलेले पो.काँ. गौरव पाटील यांच्या मदतीने तांत्रिक विश्लेषणाद्वारे हरदास वास्कले फैजपूर-रावेर मार्गे जात असल्याचे दिसून आले. पोलीस अधीक्षकांनी तात्काळ फैजपूर आणि रावेर पोलीस स्टेशनला महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमावर्ती भागात नाकाबंदी लावण्याचे आदेश दिले. त्यानुसार, स.पो.नि.मोताळे (नेम, फैजपूर) यांनी भुसावळ-फैजपूर येथे नाकाबंदी लावली. नाकाबंदीदरम्यान संशयित हरदास वास्कले मोटारसायकलवर येताना दिसला. त्याला पळून जाण्याची संधी न देता, शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे आणि त्यांच्या पथकाने ताब्यात घेतलेल्या हरदास वास्कलेची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितले की, त्याचे शेजारी राहणारा सुरेश खरते आणि गावातील रिचडीया कटोले हे गावात फिरत असताना समोरून येणाऱ्या मृत तेजस महाजनला सुरेश वास्कलेचा धक्का लागला. त्यावरून सुरेश वास्कलेने तेजसला शिवीगाळ करून मारहाण केली. तेजसने विरोध करताच, तिघांनी त्याला मारहाण केली आणि रिचडीया कटोले याने त्याच्याकडील चाकूने तेजसच्या गळ्यावर वार करून त्याला गंभीर जखमी करून ठार केले. कोणीही पाहिले नसल्याचे पाहून, त्यांनी तेजसला उचलून सुरेशने खांद्यावर नेले आणि आडमार्गाने त्यांच्या झोपड्यांच्या बाजूला असलेल्या शेतात काटेरी झुडपात लपवून ठेवले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो. उपनिरीक्षक शरद बागल, अकरम याकुब, हरिलाल पाटील, विजय पाटील, दीपक माळी, रवींद्र पाटील, विष्णू बिऱ्हाडे, संदीप पाटील, प्रवीण मांडूळे, राहुल कोळी, किशोर पाटील, पो.काँ. प्रदीप चवरे, विलेश सोनवणे, पो.ह.वा. दामोदरे, रवींद्र पाटील यांनी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी सुरेश खरते याला ताब्‍यात घेतले. त्यांचा तिसरा साथीदार रिचडीया कटोले याच्या शोधार्थ सहा.पो.नि. डोमाळे आणि कर्मचारी यांचे पथक रवाना करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT