जळगाव : जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री आणि तस्करी रोखण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत रावेर पोलिसांनी पाल येथे मोठी कारवाई केली. एका दुमजली राहत्या घरावर छापा टाकून पोलिसांनी विक्रीसाठी साठवून ठेवलेला ३ किलो २५० ग्रॅम गांजा जप्त केला. या गांजाची किंमत सुमारे १ लाख ६२ हजार ५०० रुपये असून, याप्रकरणी मेहरबान जहाँगीर तडवी (वय ३६) याला अटक करण्यात आली आहे.
जिल्ह्यात 'नशामुक्त भारत' अभियान आणि 'ऑपरेशन ऑल आउट' अंतर्गत अमली पदार्थांची अवैध विक्री व वाहतूक रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी यासंदर्भात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार १६ नोव्हेंबर रोजी रावेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील यांना पाल येथील मेहरबान तडवी याने आपल्या राहत्या घरात विक्रीच्या उद्देशाने गांजाचा साठा केल्याची गोपनीय माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने दुपारी २.२० वाजण्याच्या सुमारास संबंधित घरावर छापा टाकला. घराची झडती घेतली असता प्रवेशद्वारासमोरील जिन्याखाली लपवून ठेवलेला ३ किलो २५० ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी हा गांजा जप्त करून मेहरबान तडवी याला ताब्यात घेतले.
याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक मनोज महाजन, हवालदार ईश्वर चव्हाण तसेच पोलीस कर्मचारी विशाल पाटील, प्रमोद पाटील, सुकेश तडवी, इस्माईल तडवी, विकार शेख आणि श्रीकांत चव्हाण यांचा समावेश होता.