Raver Police Arrest
रावेर : शेतशिवारातील विजेच्या तारा चोरून नेणाऱ्या दोघांना रावेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. भोर ते अजंदा रस्त्यावरील शेतातून सुमारे ५० हजार रुपये किमतीच्या अॅल्युमिनियमच्या तारा चोरीला गेल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. जुबेर रमजान तडवी आणि शरीफ राजू तडवी (दोघे रा. विवरे, ता. रावेर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीच्या तारांचे २६ किलो वजनाचे तुकडे, तार कापण्याचे कटर आणि पक्कड जप्त करण्यात आली आहे. न्यायालयाने दोघांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अग्रवाल पॉवर प्रा. लि. कंपनीचे साईट सुपरवायझर राजेंद्र रामदास ठाकूर (रा. भादली, ता. जळगाव) यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १३६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. भोर शिवारातील गट क्रमांक ८६१ मधील विजेच्या खांबांवरील सुमारे ५० हजार रुपये किमतीच्या अॅल्युमिनियमच्या तारा कापून नेण्यात आल्या होत्या.
चोरीचे ठिकाण निर्मनुष्य शेतशिवारात असल्याने सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या. दरम्यान, जिल्ह्यात शेतपंपांच्या मोटारी आणि विजेच्या तारांची चोरी करणाऱ्यांविरोधात पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत भंगार दुकाने आणि यापूर्वी चोरीच्या गुन्ह्यांत संशयित असलेल्या व्यक्तींची तपासणी सुरू होती.
१४ ऑक्टोबर रोजी रात्री पोलीस निरीक्षक संदीप पाटील गस्तीवर असताना रावेर-अजंदा रस्त्यावर दोन संशयित दबा धरून बसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत जुबेर तडवी आणि शरीफ तडवी यांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता तार कापण्यासाठी वापरले जाणारे कटर आणि पक्कड आढळून आली.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत चोरीच्या गुन्ह्याची माहिती उघड झाल्याचे सांगण्यात आले. संशयित जुबेर तडवी हा विवरे येथे भंगाराचे दुकान चालवत असून, चोरी केलेल्या तारांचे तुकडे करून त्याने ते दुकानात लपवून ठेवल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी दुकानातून २६ किलो अॅल्युमिनियमच्या तारांचे तुकडे जप्त केले.
दोन्ही संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. रावेर तालुक्यातील अन्य शेतशिवारांमध्ये झालेल्या विजतारा चोरीच्या घटनांमध्येही त्यांचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. या तपासातून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अमोल बच्छाव, पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन आमोदकर, विजय चौधरी, समाधान ठाकूर, पोलीस कॉन्स्टेबल विकार शेख, श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, सुकेश तडवी, तुषार पाटील आणि रुबाब तडवी यांनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय चौधरी करत आहेत.