Father son fight Raver Jalgaon
जळगाव : "बाहेरगावी कामाला गेला होतास, किती पैसे कमवून आणले? त्याचा हिशोब दे आणि दारू पिऊन लोकांत आपली बदनामी करू नको," असा वडिलांनी दिलेला सल्ला एका १९ वर्षीय तरुणाच्या जिवावर बेतला आहे. संतापलेल्या मुलाने वडिलांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र या झटापटीत वडिलांच्या हातातील दांडा डोक्याला लागल्याने मुलाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना रावेर तालुक्यातील निमड्या येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पित्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निमड्या येथील रहिवासी रमेश कैलास पावरा (वय १९) हा तरुण बाहेरगावी कामाला गेला होता. तो परतल्यानंतर त्याचे वडील कैलास रूपसिंग पावरा (वय ४०) यांनी त्याला कष्टाच्या पैशांचा हिशोब विचारला. तसेच रमेशला दारूचे व्यसन असल्याने, "दारू पिऊन लोकांत घराण्याची बदनामी करू नको," असे वडील प्रेमाने समजावून सांगत होते. मात्र, दारूच्या नशेत असलेल्या रमेशला या गोष्टीचा राग आला आणि त्याने रागाच्या भरात दांडा घेऊन वडिलांना मारण्यासाठी धाव घेतली.
मुलगा आपल्याला मारण्यासाठी येत असल्याचे पाहून कैलास पावरा यांनी स्वसंरक्षणार्थ त्याच्या हातातील दांडा पकडला. दोघांमध्ये झालेल्या ओढाताणीत आणि झटापटीत कैलास यांच्या हातातील दांडा जोरात रमेशच्या डोक्याच्या मध्यभागी लागला. या घाताने रमेश जागीच बेशुद्ध पडला. त्याला तातडीने उपचारासाठी इंदूर (मध्य प्रदेश) येथे हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ही घटना २३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली होती. उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाल्यानंतर, ८ मे रोजी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. मयत रमेशची आई सौ. गेंदाबाई कैलास पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचे पती कैलास रूपसिंग पावरा यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०५ (सदोष मनुष्यवध) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या घटनेमुळे रावेर तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून मद्यपानाचे व्यसन कसे संसार उद्धवस्त करते, याचे हे विदारक चित्र समोर आले आहे. रावेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पो.नि. डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे.