Agriculture News Pudhari
जळगाव

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात वरुणराजाची 'वक्रदृष्टी'; खरीप पेरण्यांचा खोळंबा, फक्त २३ टक्केच पेरणी पूर्ण

...तर अमळनेर आघाडीवर, यावल तालुका सर्वात पिछाडीवर

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जून महिना संपला तरी जिल्ह्यात दमदार पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. परिणामी, यंदाच्या २0२६-२७ च्या खरीप हंगामात जिल्ह्यात पेरण्यांचा मोठा खोळंबा उडाल्याचे चित्र आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण क्षेत्रापैकी केवळ २३.०८ टक्के १,७७,४९४ हेक्टर क्षेत्रावरच पेरणी पूर्ण होऊ शकली आहे. पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा आता चातकासारखी पावसाची वाट पाहत आहे.

तृणधान्य आणि कडधान्याची स्थिती

जिल्ह्यात तृणधान्यांचे (भात, ज्वारी, बाजरी, मका) सरासरी क्षेत्र १,४६,८४९ हेक्टर असताना प्रत्यक्षात केवळ ३०,६५२.६१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यात सर्वाधिक मक्याची २९,५९०.११ हेक्टरवर पेरणी झाली आहे. दुसरीकडे, कडधान्यांची (तूर, मूग, उडीद) स्थितीही बिकट असून ४६,४१० हेक्टरपैकी केवळ ५,८१७.१० हेक्टरवर पेरण्या उरकल्या आहेत. यात तुरीचा पेरा ३,३७८.४० हेक्टरवर झाला आहे.

पांढरं सोनंही संकटात; कापसाची पेरणी सुस्तावली

जळगावचा मुख्य कणा असलेल्या कापसाच्या लागवडीलाही चांगलाच फटका बसला आहे. जिल्ह्यात ५,४६,९३३ हेक्टर कापसाचे सरासरी क्षेत्र असताना, आतापर्यंत अवघ्या १,३८,८८२.५० हेक्टरवर कापसाची लावण झाली आहे. गळीत धान्यांमध्ये सोयाबीनची १५२५.२० हेक्टरवर पेरणी झाली असून एकूण गळीत धान्याचा पेरा अवघा ८.५७ टक्के आहे.

शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे

तालुकावार आकडेवारी पाहिल्यास जिल्ह्यात मोठी विषमता दिसून येत आहे. अमळनेर तालुक्यात सर्वाधिक ४६ टक्के पेरणी झाली असून, येथील शेतकऱ्यांनी ३१,५२७.५० हेक्टरवर पेरण्या पूर्ण केल्या आहेत. भडगाव तालुका ३४.७ टक्के पेरणीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. यावल तालुक्यात सर्वात कमी म्हणजे अवघी २.२ टक्के ७४४.५० हेक्टर पेरणी झाली आहे. जळगाव तालुक्यात ८.१ टक्के आणि रावेर तालुक्यात १०.१ टक्के पेरणी झाली आहे, जी अत्यंत चिंताजनक आहे. शेतकऱ्यांचे डोळे फक्त आभाळाकडे लागले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT