Samta Sainik Dal Protest
जळगाव : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात उल्लेख टाळल्याच्या निषेधार्थ जळगावात आज (दि. २७) मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात समता सैनिक दलाने एल्गार पुकारत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रेल्वे स्टेशन येथील पुतळ्यासमोर निदर्शने केली. यावेळी 'गिरीश महाजन मुर्दाबाद'च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला .
नाशिक येथे २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी पालकमंत्री म्हणून भाषण करताना गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करणे टाळले, असा आरोप समता सैनिक दलाने केला आहे. संविधानाच्या निर्मात्याचे नाव घेण्यास मंत्र्यांना विसर पडतोच कसा? असा संतप्त सवाल उपस्थित करत आज समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.
यावेळी बोलताना समता सैनिक दलाचे राज्य संघटक विजय निकम यांनी महाजनांवर तोफ डागली. ते म्हणाले, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान निर्माण करण्यात मोठे योगदान आहे. मात्र, कुंभमेळा मंत्री असलेल्या गिरीश महाजन यांनी जाणीवपूर्वक त्यांचे नाव घेतले नाही. चुकून नाव राहिले, ही सारवासारव चालणार नाही. मंत्र्यांना बाबासाहेबांच्या नावाची ॲलर्जी आहे का?" असा खोचक सवाल निकम यांनी उपस्थित केला.
केवळ निषेध करून आंदोलक थांबले नाहीत, तर त्यांनी मंत्र्यांवर थेट कारवाईची मागणी केली आहे. गिरीश महाजन यांच्यावर त्वरित ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच, मुख्यमंत्र्यांनी त्यांची हकालपट्टी करावी किंवा महाजन यांनी स्वतः नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
जोपर्यंत गिरीश महाजन या प्रकाराबद्दल आंबेडकरवादी जनतेची जाहीर माफी मागत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहील. तसेच माफी न मागितल्यास मंत्र्यांना जळगाव जिल्ह्यात फिरू दिले जाणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला. आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.