ठळक मुद्दे
जळगाव जिल्ह्यात एकूण 18 ठिकाणी दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.
नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवारी संपली असून नगरसेवकांच्या 464 जागांसाठी तब्बल 3542 उमेदवारी अर्ज दाखल
नगराध्यक्षपदाच्या 18 जागांसाठी 229 उमेदवारांनी अर्ज दाखल करून स्पर्धा चुरशीची होण्याचे संकेत
जळगाव : जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींची निवडणूक जबाबदारी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या खांद्यावर असताना त्यांच्या स्वतःच्या विधानसभा क्षेत्रातच भाजपात फूट पडली आहे. वरणगाव नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी बंड करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना तिकीट न देण्यामागे खडसे कुटुंबीयांना विरोध केल्याची चर्चा सुरू आहे.
सुनील काळे हे गिरीश महाजन यांचे निष्ठावंत मानले जातात. महाजन यांनी शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला, पण तोही यशस्वी ठरला नाही. त्यामुळे पक्षातील निष्ठावंतांना डावलले की खडसे विरोधकांना बाजूला सारले, यावर चर्चा सुरु आहे.
वरणगावमध्ये सावकारेंची प्रतिष्ठा पणाला
भाजपने सुनील काळे यांना तिकीट न देता जिल्हा दूध संघाच्या संचालिका शामल झांबरे यांची निवड केली. याचा निषेध म्हणून काळे यांनी सावकारे यांच्या कार्यालयावर आंदोलनही केले होते. अखेर पक्षाने त्यांना संधी न दिल्याने त्यांनी अपक्ष म्हणून दावा ठोकला आहे. त्यामुळे वरणगावमध्ये आता उमेदवारी अशी झाली आहे
भाजप: शामल झांबरे
राष्ट्रवादी (शरद पवार गट): राजेंद्र चौधरी
शिवसेना शिंदे: तृप्ती महाजन
इतर: संभाजी देशमुख
अपक्ष: सुनील काळे (भाजप माजी नगराध्यक्ष)
ही परिस्थिती निवडणूक तिरंगी राहणार की चौरंगी होणार, हे ठरवेल. त्याचवेळी सावकारे यांच्या नेतृत्वाची पहिली मोठी परीक्षा म्हणून ही निवडणूक पाहिली जात आहे.
लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसे यांच्या तिकिटाला सुनील काळे यांनी वरणगावात विरोध केला होता. आता त्यांच्या उमेदवारीवर गदा येण्याचे कारण याबाबतच असल्याचे बोलले जात आहे. भुसावळमध्ये सावकारे यांनी नगराध्यक्ष पदाचे तिकीट स्वतःच्या कुटुंबात ठेवल्याने लेवा पाटील समाज नाराज होऊ नये म्हणून वरणगावमध्ये लेवा पाटील समाजातील उमेदवार उभा केल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे दोन्ही नगरपरिषदांत जातीय गणितेही महत्त्वाची ठरत आहेत.
गिरीश महाजन यांनी एकदा हस्तक्षेप केल्यानंतर मात्र ते शांत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खडसे समर्थकांनीच बाजी मारली असावी अशी चर्चा उपस्थित होत आहे. या राजकीय घडामोडींमुळे वरणगाव नगरपंचायत निवडणूक राज्यस्तरावर चर्चेचा विषय होत आहे.
जळगाव जिल्ह्यातील सर्व 18 नगरपरिषद आणि नगरपंचायतींची निवडणूक जबाबदारी भाजपने सावकारे यांच्या हातात दिली आहे. त्यांच्या स्वतःच्या भुसावळ विधानसभा क्षेत्रातील वरणगाव आणि भुसावळमध्ये त्यांना किती यश मिळते, हे राजकीय समीकरणांवर परिणाम करेल. पक्षातील बंडखोरी किती नियंत्रणात आणता येते आणि निष्ठावंतांचा असंतोष शांत होतो का, याकडे कार्यकर्ते देखील बारकाईने लक्ष ठेवून आहेत.