जळगाव : जिल्ह्यातील 18 नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी दाखल झालेल्या नामनिर्देशनपत्रांची छाननी पूर्ण झाली आहे. नगरसेवक पदासाठी दाखल 4077 अर्जांपैकी 945 अर्ज बाद झाले आहेत. तसेच नगराध्यक्ष पदासाठी दाखल 242 अर्जांपैकी 68 अर्ज अवैध ठरले आहेत.
छाननीनंतर आता माघारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अपक्ष उमेदवारांची संख्या कमी करण्यासाठी आणि मतविभाजन रोखण्यासाठी पक्षांचे नेते कशी मनधरणी करतात याकडे सर्वांचा कटाक्ष आहे. अनेक ठिकाणी अपक्ष मैदानात राहिल्यास मतांची विभागणी होऊ शकते, त्यामुळे पक्षांतर्गत हालचाली वाढल्या आहेत.
जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना रंग
निवडणुकीची औपचारिक प्रक्रिया सुरू असून सर्वत्र राजकीय गणिते तापू लागली आहेत. प्रचार सुरू असताना कोण माघार घेणार, कोण टिकणार आणि कोणाच्या माघारीचा फायदा कोणाला होणार, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
भुसावळमध्ये तिरंगी लढतीचे संकेत
भुसावळमध्ये भाजप उमेदवार रंजना सावकारे यांच्या विजयाचा मार्ग सुकर करण्यासाठी मतविभाजनाचे समीकरण रंगात आहे.
राष्ट्रवादी (अजित पवार गट) येथून अर्शिया खान मैदानात उतरल्याने मुस्लिम मतांमध्ये दुभंग होण्याची चर्चा आहे.
तर राष्ट्रवादी (शरद पवार गट) येथून भंगाळे यांना उमेदवारी मिळाल्यामुळे लेवा पाटील समाजातील मतांचे विभाजन होऊ शकते.
या पार्श्वभूमीवर सावकारे यांच्या संधी वाढतील अशी चर्चा सुरू आहे.
मुक्ताईनगरमध्ये जुने वैर आणि नवा पेच
एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील जुना संघर्ष ओळखलाच आहे. सुरुवातीला खडसे यांनी माघार घेतल्याने पाटील यांचा मार्ग सोपा होणार असे वाटत होते. परंतु भाजपने स्वतंत्र उमेदवार दिल्याने आता भाजप आणि शिंदे गटामध्ये थेट लढत होत आहे. या लढतीची जाबाबदारी आता केंद्रीय मंत्र्यांनी स्वतः घेतली आहे.
चाळीसगावमध्ये स्थानिक लढत तापले
चाळीसगावमध्ये मंगेश चव्हाण हे पत्नींच्या विजयासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या विरोधात स्वर्गीय राजे देशमुख यांच्या पत्नी उभ्या राहिल्याने या ठिकाणची निवडणूक रंगतदार झाली आहे.
पाचोरामध्ये आमदार विरुद्ध माजी आमदार
पाचोर्यात शिंदे सेनेचे आमदार किशोर पाटील हे त्यांच्या पत्नीच्या विजयासाठी जोरदार तयारी करत आहेत. त्यांना राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी आव्हान दिले आहे. तर वाघ यांनी भाजपात प्रवेश करत त्यांच्या पत्नीची उमेदवारी जाहीर केली आहे. दोन्ही घराण्यांतील स्पर्धेमुळे पाचोर्यात चुरस वाढली आहे.
वरणगावमध्ये बंडखोरीचा झेंडा
वरणगावमध्ये माजी नगराध्यक्षांनी बंड पुकारत अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे. लेवा पाटील समाजाची नाराजी टाळण्यासाठी भाजपने या समाजातील महिला उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.
जामनेरमध्ये भाजपा बळकट स्थितीत
जामनेरमध्ये विद्यमान नगराध्यक्षांच्या पत्नी पुनर्निवडीच्या प्रयत्नात आहेत. विरोधकांकडून उमेदवार असूनही त्यांची ताकद कमी झाल्याचे दिसते. विरोधी गटातील प्रमुख नेते संजय गरुड आणि राजपूत यांनी भाजपात प्रवेश केल्याने सत्ताधाऱ्यांची स्थिती अधिक मजबूत झाली आहे.
एकूण छाननीचे चित्र असे...
जळगाव जिल्ह्यातील नगरसेवक पदासाठी 3,835 मान्य अर्ज
नगराध्यक्ष पदासाठी 174 मान्य अर्ज
छाननीनंतरची माघार प्रक्रिया आता राजकीय समीकरणे बदलू शकते. पक्षांमधील चर्चांची आणि मनधरणीची चर्चा पुढील काही दिवसांत जोर वाढणार आहे.