जळगाव: जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसतानाच, उमेदवारीवरून अंतर्गत वाद उफाळून आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या कट्टर महिला कार्यकर्त्या कलाबाई शिरसाठ यांनी प्रभाग क्रमांक 10 मधून उमेदवारी नाकारल्याचा आरोप करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी टोकाचे पाऊल उचलण्याचा इशाराही दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
प्रभाग क्रमांक 10 मधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करत कलाबाई शिरसाठ यांनी सोमवार ( दि.29) रोजी आज आपला नामनिर्देशन अर्ज दाखल केला. माध्यमांशी बोलताना त्या भावूक झाल्या. महाविकास आघाडीत हा प्रभाग उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे गेल्याचे सांगत, त्या प्रभागातील चारही जागांवर ठाकरे गटाच्या उमेदवारांना तिकीट देण्यात आल्याचा आरोप त्यांनी माध्यमांसमोर व्यक्त होत केला.
‘प्रामाणिकपणे पक्षासाठी काम करूनही डावलले’ असा आरोप
कलाबाई शिरसाठ यांनी ठाकरे गटाच्या स्थानिक नेतृत्वावर गंभीर आरोप केले. आपण मागासवर्गीय समाजातील असूनही आणि अनेक वर्षे प्रामाणिकपणे पक्षासाठी काम करूनही जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. स्थानिक नेते केवळ आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांनाच संधी देत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. “माझ्यावर हा अन्याय का?” असा सवाल करत त्या भररस्त्यात त्यांना अश्रू अनावर झाले.
तिकीट नाकारल्याच्या मुद्द्यावरून कलाबाई शिरसाठ यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. आपल्यावर झालेला अन्याय दूर न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिल्याने प्रशासन आणि राजकीय पक्षांची धाकधूक वाढली आहे. या प्रकरणामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.