भुसावळ नगरपरिषद / Bhusawal Municipal Council Pudhari News Network
जळगाव

Jalgaon Politics : भुसावळच्या राजकारणात भूकंप?

नगराध्यक्षपदासाठी मंत्रिपत्नी विरुद्ध खडसे गट , पाणी प्रश्नावर महायुतीची कसोटी

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यातील ‘अ’ दर्जाच्या भुसावळ नगरपरिषदेची निवडणूक तब्बल नऊ वर्षांच्या प्रशासकीय कारभारानंतर जाहीर होण्याच्या मार्गावर आहे. नगराध्यक्षपदासाठी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री यांच्या पत्नीला उमेदवारी मिळाल्याने घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत नाराजी उफाळून आली असून राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (शिंदे)-भाजप यांच्यात थेट लढत रंगण्याची चिन्हे आहेत.

नगराध्यक्षपद आरक्षित होताच मंत्रिपत्नींची उमेदवारी निश्चित करण्यात आली. त्यामुळे भाजपमध्ये नाराज कार्यकर्त्यांची संख्या वाढली आहे. पक्षात सक्षम स्थानिक नेतृत्व नसल्याचे हे लक्षण मानले जात आहे. या प्रक्रियेमुळे मंत्री महोदयांवर घराणेशाही पुन्हा पुढे आली आहे.

महायुतीतील घटक असलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार गट) ला भुसावळच्या वाटपात जागा न मिळाल्याने त्यांनी स्वतंत्र लढतीचा मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे महायुतीत उघडपणे फूट पडली आहे आणि ही निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता वाढली आहे.

महायुतीतील या फुटीचा फायदा घेण्यासाठी राष्ट्रवादी (शरद पवार गट) सज्ज झाला आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि माजी आमदार संतोष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये झालेली समजोता आणि संयुक्त मोहीम महायुतीसाठी आव्हान ठरू शकते.

भुसावळ येथील पाणीप्रश्न ठरणार निर्णायक

भुसावळचा पाणीपुरवठा हा निवडणुकीतील सर्वात संवेदनशील मुद्दा ठरणार आहे. येथील नागरिकांना उन्हाळ्याच्या प्रारंभापासूनच तब्बल 10 ते 15 दिवसांनी पाणी मिळत असल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी वाढली आहे.

  • अमृत योजनेचे कासवगतीने सुरू असलेले काम

  • वारंवार बदललेल्या आराखड्यामुळे वाढलेला खर्च

  • पाण्याच्या टाक्यांचे अपूर्ण काम

या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांची भूमिका आणि मंत्रिपत्नींची उमेदवारी यावरच निकाल मोठ्या प्रमाणावर अवलंबून असेल. स्थानिक उमेदवारांची प्रतिमा आणि पाणीपुरवठा यंत्रणेची स्थिती यांची थेट परीक्षा निवडणूकीतून होणार आहे.

एकूणच, घराणेशाहीचा आरोप, महायुतीतील फूट, खडसे गटाचे आव्हान आणि गंभीर पाणीप्रश्न यांच्या पार्श्वभूमीवर भुसावळची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT