जळगाव : महायुतीत जळगाव विधान परिषदेची जागा भाजपच्या पदरात पडताच शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. पालकमंत्री गुलाबराव पाटील प्रचंड नाराज असल्याची बातमी ‘दैनिक पुढारी’ने प्रसिद्ध केली. या एकाच बातमीने भाजपच्या गोटात खळबळ उडाली की, डॅमेज कंट्रोल करण्यासाठी भाजप उमेदवाराला थेट पालकमंत्र्यांचे गाव ‘पाळधी’ गाठावे लागले. मंगळवारी तातडीने घडलेल्या या घडामोडीत भाजप नेत्यांनी गुलाबरावांना पुष्पगुच्छ देत त्यांची मनधरणी करण्याचा आणि धुसफूस थंड करण्याचा जोरदार प्रयत्न केला.
‘दैनिक पुढारी’ने महायुतीत ‘धुसफूस’: जळगावची जागा भाजपला गेल्याने गुलाबराव पाटील प्रचंड नाराज! या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून राजकीय वर्तुळात बॉम्ब टाकला होता. शिंदे सेना जर बॅकफूटवर गेली किंवा त्यांनी छुप्या पद्धतीने असहकार पुकारला, तर भाजप उमेदवाराचा गेम होऊ शकतो, हे गणित पक्के ठाऊक असल्याने भाजप नेत्यांचे धाबे दणाणले.
परिणामी, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी आणि विधान परिषदेचे अधिकृत उमेदवार नंदकुमार महाजन यांनी इतर सहकाऱ्यांसह थेट पाळधी गाठून पालकमंत्र्यांच्या दारात हजेरी लावली. या बंददार बैठकीत येत्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रणनीतीवर आणि मतांच्या गणितावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे
शिंदेंच्या शिवसेनेची साथ नसेल तर भाजपला ही निवडणूक किती जड जाऊ शकते, याची जाणीव झाल्यानेच ही 'पुष्पगुच्छ डिप्लोमसी' पाहायला मिळाली. मात्र, वरवर सर्व आलबेल दाखवण्याचा प्रयत्न झाला असला तरी पालकमंत्र्यांची खरी नाराजी दूर झाली की नाही आणि शिंदे गटातील बंड थंड गतीने शमणार की आणखी भडकणार, हे अर्ज माघारीच्या अंतिम दिवशीच स्पष्ट होईल. तोपर्यंत जळगावच्या राजकीय वर्तुळात ‘पाळधी’च्या या भेटीचीच उलटसुलट चर्चा रंगणार आहे.