जळगाव : राज्य सरकारने नगरपरिषद व नगरपालिका निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर केले असून, या आरक्षणामुळे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ आणि जामनेर या दोन्ही नगरपरिषदांवर नामदारांच्या घरातील व्यक्तींची सत्ता प्रस्थापित होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. तसेच ‘लाडक्या बहिणींचे पती’ या टोपणनावाने ओळखले जाणारे नेते तब्बल नऊ नगरपालिकांवर आपली सत्ता गाजवणार आहेत.
भुसावळ आणि जामनेर या दोन्ही नगरपरिषदांवर नामदारांचा ठसा उमटणार हे जवळपास निश्चित झाले आहे. भुसावळच्या राजकारणात मागील काही काळात सक्रिय झालेल्या नामदारांच्या पत्नी राजनी सावकारे या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या प्रमुख दावेदार ठरणार असल्याचे संकेत आहेत. तर जामनेर नगरपालिकेत नामदार गिरीश महाजन यांच्या पत्नी पुन्हा एकदा नगराध्यक्ष पदाच्या रेसमध्ये राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
‘लाडक्या बहिणींचे पती’ या नऊ नगरपालिकांवर सत्ता गाजवणार
‘लाडक्या बहिणींचे पती’ म्हणून ओळखले जाणारे नेते यावल, रावेर, मुक्ताईनगर, सावदा, फैजपूर, पाचोरा, भडगाव, धरणगाव आणि चोपडा या नगरपरिषदांवर आपले वर्चस्व राखतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
या आरक्षण जाहीरनाम्यामुळे यावल, रावेर, मुक्ताईनगर, सावदा, फैजपूर परिसरातील इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाल्याचे दिसून येत आहे. प्रथमच निवडणूक होणाऱ्या नशिराबाद नगरपंचायतीत मागासवर्गीय प्रवर्गाचे आरक्षण निघाले असून, ही निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. तसेच भुसावळ तालुक्यातील वरणगाव नगरपरिषदेत नामाप्र प्रवर्गाचे आरक्षण असल्याने येथेही चुरशीची लढत अपेक्षित आहे.
चाळीसगाव हा आमदार मंगेश चव्हाण यांचा बालेकिल्ला असून, या ठिकाणी खुला प्रवर्ग राखीव असल्याने ते पुन्हा सत्ता राखणार की त्यांना आव्हान मिळणार याकडे लक्ष आहे.
राज्यातील सर्वाधिक चर्चेतील मुक्ताईनगर नगरपरिषदेत महिला खुला प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे येथील निवडणुकीत शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार एकनाथराव खडसे यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आरक्षणाचा तपशील असा...
अनुसूचित जाती प्रवर्ग: भुसावळ, सावदा
अनुसूचित जमाती प्रवर्ग: भडगाव, एरंडोल, अमळनेर
मागासवर्गीय महिला राखीव: चोपडा, वरणगाव
महिला खुला प्रवर्ग: धरणगाव, रावेर, जामनेर, यावल, पाचोरा, मुक्ताईनगर, फैजपूर
खुला प्रवर्ग: बोदवड, चाळीसगाव, शेंदुर्णी, पारोळा, नशिराबाद
या जिल्ह्यातील आरक्षण जाहीरनाम्यामुळे राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून, अनेक ठिकाणी प्रतिष्ठेच्या चुरशीच्या लढती रंगणार आहेत.