जळगाव : रशिया-युक्रेन युद्धाच्या छायेत जग होरपळत असताना, भारताच्या आर्थिक स्थितीला बळकटी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना काटकसरीचे आणि डॉलर वाचवण्याचे आवाहन केले आहे. मात्र, जळगावात भाजपच्या 'संकटमोचकांनी' आपल्या वाढदिवसानिमित्त या आदेशाला अक्षरशः 'तेलांजली' दिल्याचे चित्र दिसत आहे. वयाच्या ६६ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या नेत्यासाठी चक्क ६६ फुटी महाकाय कटआऊट उभा करून "जिल्ह्यात बॉस कोण?" हे दाखवण्याचा केविलवाणा अट्टाहास करण्यात आला आहे.
देशाला आर्थिक शिस्त, नेत्याला मात्र 'अभिषेक'!
एकिकडे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री देशाला 'सोने आणि पेट्रोलचा वापर विचारपूर्वक करा' असे सांगत आहेत, तर दुसरीकडे जळगावात दक्षिण भारतीय चित्रपट संस्कृतीची आठवण करून देणारा तमाशा सुरू आहे. जीएम फाउंडेशनच्या समोर उभ्या असलेल्या ६६ फुटी कटआऊटला पाहून "हे लोकशाहीचे राज्य आहे की वर्चस्ववादाचे?" असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. दाक्षिणात्य हिरोंच्या कटआऊटवर जसा दुग्धाभिषेक होतो, तशीच काहीशी चढाओढ जळगावच्या 'हिरों'च्या समर्थकांमध्ये लागलेली दिसत आहे.
'वसंत स्मृती' अडगळीत, ६६ फुटी इगो हवेत!
ज्या 'वसंत स्मृती' कार्यालयातून संघर्ष करून भाजपने सत्ता मिळवली, त्या जुन्या कार्यालयाची अवस्था आज 'अडगळीच्या खोली'सारखी झाली आहे. नेत्यांना आता संघर्षाच्या आठवणींपेक्षा 'जीएम फाउंडेशन'च्या हायटेक वास्तूत विसावणे आणि समोर ६६ फुटी कटआऊट उभे करणे अधिक प्रतिष्ठेचे वाटू लागले आहे. जळगावच्या इतिहासात आजवर कोणत्याही नेत्याच्या वाढदिवसाला असा प्रयोग झाला नव्हता, जो आज केवळ वर्चस्व टिकवण्यासाठी केला जात आहे.
काय सांगताय, जाहिरात देऊ नका?
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना जाहिरातबाजी टाळण्याचे आणि समाजोपयोगी कामे करण्याचे आदेश दिले होते. मात्र, जळगावात या आदेशाची पायमल्ली करत कार्यकर्त्यांच्या 'आडून' बॅनरबाजीचा आणि कटआऊटचा डोंगर उभा केला आहे. कार्यकर्त्यांची किती मोठी फौज आपल्या मागे आहे, हे सिद्ध करण्यासाठी लाखो रुपये खर्चून उभारलेले हे 'शक्तिप्रदर्शन' म्हणजे पंतप्रधानांच्या काटकसरीच्या भूमिकेला दिलेले आव्हानच म्हणावे लागेल.
चाहते की समर्थकांचा अट्टाहास?
चित्रपटसृष्टीतील कलाकारांप्रमाणे राजकीय नेत्यांचेही 'वेडे चाहते' असतात हे जळगावात दिसून आले आहे. या ६६ फुटी कटआऊटच्या माध्यमातून समर्थक केवळ आपले प्रेम व्यक्त करत नसून, जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना 'आस्मान' दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, सामान्यांच्या प्रश्नांऐवजी नेत्याच्या उंचीचा कटआऊट महत्त्वाचा ठरल्याने निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.