जळगाव शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला. Pudhari
जळगाव

Jalgaon Traffic Jam | जळगावात सभेसाठी मुख्य रस्त्यावरच व्यासपीठ, वाहतुकीचा खोळंबा, पोलीस अधीक्षकांचे वाहनही अडकले

सभेच्या मंडपामुळे रस्ता अरुंद; बेकायदा पार्किंगने कोंडीत भर

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon Main Road Rally

जळगाव : महायुती सरकारविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने मंगळवारी (दि.६) आयोजित करण्यात आलेल्या ‘एल्गार मोर्चा’पूर्वीच जळगाव शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाच्या सभेसाठी मुख्य रस्त्यावरच व्यासपीठ व खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आल्याने सकाळच्या कार्यालयीन वेळेतच वाहतूक कोंडी झाली. या कोंडीचा फटका चक्क जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या वाहनालाही बसला.

आकाशवाणी चौक ते स्वातंत्र्य चौक हा शहरातील अत्यंत वर्दळीचा आणि महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद अध्यक्षांचा बंगला, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय, आकाशवाणी केंद्र, विविध बँका तसेच व्यापारी प्रतिष्ठाने आहेत. मोर्चाची सभा दुपारी होणार असतानाही सकाळपासूनच रस्त्याच्या एका बाजूला स्टेज व खुर्च्यांची मांडणी करण्यात आली. त्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक एकाच अरुंद मार्गावरून सुरू राहिल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

बेकायदा पार्किंगने कोंडीत भर

स्वातंत्र्य चौकापासून सार्वजनिक बांधकाम विभागापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बेकायदा पार्किंगची समस्या कायम आहे. मोर्चाच्या सभेची तयारी आणि रस्त्यावरील बेकायदा पार्किंग यामुळे वाहतुकीसाठी उपलब्ध जागा आणखी कमी झाली. परिणामी, सकाळच्या कार्यालयीन वेळेतच वाहनचालकांना मोठ्या कोंडीचा सामना करावा लागला.

पोलीस अधीक्षकांचे वाहनही वाहतूक कोंडीत अडकल्याने वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची धावपळ उडाली. सर्वसामान्य नागरिकांना दररोज या मार्गावर बेकायदा पार्किंगचा त्रास सहन करावा लागत असताना वाहतूक शाखेकडून ठोस कारवाई होत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे.

कर्मचारी, नागरिकांची तारांबळ

जिल्हाधिकारी कार्यालय, विविध शासकीय विभाग, बँका आणि व्यापारी आस्थापनांमध्ये जाणाऱ्या कर्मचारी व नागरिकांची या कोंडीमुळे मोठी गैरसोय झाली. वेळेत कार्यालय गाठण्यासाठी अनेक वाहनधारकांना पर्यायी मार्गांचा आधार घ्यावा लागला.

मोर्चे, सभा आणि आंदोलनांसाठी वाहतुकीचे नियोजन करून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे अपेक्षित असताना मुख्य प्रशासकीय मार्गावरच वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. आंदोलनांच्या आयोजनामुळे सर्वसामान्यांना वेठीस धरले जाऊ नये, तसेच बेकायदा पार्किंगवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी जळगावकरांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT