जळगाव : मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या मतदानादरम्यान वातावरण चांगलेच तापले आहे. मतदारांना भेटण्यासाठी नेते फिरत असताना, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्याच्या मागे एकनाथ खडसे यांचे वाहन असल्याचा प्रसंग माध्यमांनी त्यांच्या कॅमेरात टिपला, यानंतर या दोन्ही नेत्यांनी आमनेसामने आल्यावर राजकीय मुक्ताफळे उधळल्याने मुक्ताईनगरमधील राजकीय तापमान वाढले आहे.
ते प्रचारात आहेत, मीही आहे. येण्यास कोणी मनाई करू शकत नाही, असे आमदार चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. याच वेळी त्यांनी धनुष्यबाण चिन्हाच्या विजयाचा ठाम दावा केला. या वेळेस प्रचार यंत्रणा पूर्ण ताकदीने लढत असून शंभर टक्के धनुष्यबाणच निवडून येईल, असे त्यांनी सांगितले.
दुसरीकडे, खडसे यांनी या घटनेला वेगळ्याच शब्दांत रंग दिला. रस्ता अरुंद आहे. आम्हाला ओव्हरटेक करून पुढे जावे लागले, शहरात कोणते वातावरण आहे ते यातून दिसते,” असे एकनाथ खडसे म्हणाले.
त्यानंतर एकनाथ खडसे यांनी या घटनेला थेट स्थानिक परिस्थितीशी जोडत गंभीर आरोप केले, हीच तर गुंडगिरी. त्याला उत्तर द्यायलाच आम्ही मैदानात आलो आहोत, असा त्यांनी आरोप केला.
मुक्ताईनगर हा खडसेंचा पारंपरिक प्रभावक्षेत्र मानला जातो. गेल्या काही वर्षांत येथे खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील वैचारिक आणि राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. मतदानाच्या दिवशी घडलेली ही ओव्हरटेकची घटना आणि त्यावर झालेली वक्तव्ये, स्थानिक पातळीवर तणाव किती वाढला आहे याचे संकेत देतात.