जळगाव : भुसावळ शहरातील वांजोळा रोडवरील प्रेरणानगर जवळील परिसरात दोन व्यक्ती गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली. आरोपींसह त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आल्या असून याप्रकरणात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबत बाजारपेठ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बाजारपेठचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना गुप्त माहिती मिळाली. भुसावळ शहरातील वांजोळा रोडवरील प्रेरणानगर जवळ दोन संशयित व्यक्ती मुकेश मोहन अटवाल, यश किरण बोयत (दोघे राहणार भुसावळ) हे त्यांच्या कब्जात गावठी पिस्टल बाळगुन फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक मंगेश जाधव, विजय नेरकर, निलेश चौधरी, महेश चौधरी, प्रशांत सोनार, अमर अढाळे, जावेद शहा हकीम शहा, भुषण चौधरी, राहुल वानखेडे यांच्या पथकाने आरोपींचा शोध घेतला असता आरोपी भुसावळ शहरातील वांजोळा रोडवरील प्रेरणानगर जवळील बोर्डा जवळ असल्याचे आढळले. संशयित आरोपींना ताब्यात घेवुन घेऊन त्यांची झाडाझडती घेतली असता मुकेश मोहन अटवाल (वय 20 वर्ष रा. वाल्मीक नगर, भुसावळ), यश किरण बोयत (वय 22 वर्ष रा. अंजली हॉस्पीटल जवळ, तनारिका हॉटेल, भुसावळ) यांच्याजवळ 20 हजार व 30 हजार रुपये किमतीचे असे दोन लोखंडी गावठी पिस्टल मॅगझीनसह तर 1,000 रुपये किमतीचे दोन जिवंत काडतुस असा एकूण 51 हजार रुपयाचा मुद्देमाल मिळून आला आहे.
पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी तसेच अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल वाघ व बाजार पेठ यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली.