Gambling Den Raid Jalgaon Pudhari
जळगाव

Jalgaon Police Raid | जळगावात मोठी कारवाई : एकाच दिवशी चार जुगार अड्ड्यांवर छापेमारी; ८ बुकी जेरबंद

छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अवैध जुगार व मटका अड्ड्यांविरोधात पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Gambling Den Raid Jalgaon

जळगाव : जळगाव शहरात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अवैध जुगार व मटका अड्ड्यांविरोधात पोलिसांनी मंगळवारी (२ जून) मोठी कारवाई करत एकाच दिवशी चार वेगवेगळ्या ठिकाणी धाडसत्र राबवले. उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या विशेष पथकाने केलेल्या या कारवाईत आठ बुकींना रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांच्याकडून ३३ हजार ८४० रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सुरू असलेल्या जुगार आणि सट्टा व्यवसायांवर एकाच वेळी कारवाई करण्यात आली. सर्व संशयितांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बाजारपेठ परिसरात मटका अड्ड्यावर छापा

जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाजारपेठेतील एका मुतारीच्या भिंतीच्या आडोशाला ‘कल्याण मटका’ सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सायंकाळी ६.१५ वाजता टाकलेल्या छाप्यात नंदलाल गणपत बुरुजवाले (५६, रा. नशिराबाद) आणि अशोक गोपाळ महाजन (४९, रा. जुना आसोदा रोड, जळगाव) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून २ हजार ६८० रुपये रोख, मटक्याच्या स्लिप्स व कार्बन पेपर जप्त करण्यात आले.

एमआयडीसी परिसरात सर्वात मोठी कारवाई

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुप्रीम कॉलनीसमोरील रस्त्यालगतच्या टपरीच्या आडोशाला ‘वरली मेनबाजार’ सट्टा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सायंकाळी ७ वाजता धाड टाकण्यात आली. या कारवाईत रहीम मेहताब तडवी (४३), निलेश लक्ष्मण सोनार (२८), आशिक शाहा शहादत शाहा (३२) आणि दीपक राजेंद्र सोनार (४२) या चौघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १५ हजार ७४० रुपये रोख आणि सट्ट्याचे साहित्य जप्त करण्यात आले.

आझादनगर टी-पॉईंटवर सट्टा उघड

रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आझादनगर टी-पॉईंट परिसरात एका टपरीच्या आडोशाला ‘मिलन डे’ सट्टा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सायंकाळी ६.१० वाजता कारवाई करण्यात आली. या ठिकाणी दीपक राजाराम रणसिंगे (३८, रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ६ हजार ९९० रुपये रोख, सट्ट्याचे आकडे आणि पावती पुस्तके जप्त करण्यात आली.

रेल्वे गेट परिसरात बुकीला अटक

जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बॉम्बे रेल्वे गेटसमोरील पुलाखाली ‘मिलन डे ओपन’ सट्टा सुरू असल्याची माहिती मिळताच दुपारी ४ वाजता पोलिसांनी धाड टाकली. यावेळी भरत खेमसिंग गोरखा (३९, रा. इंद्रप्रस्थ नगर, जळगाव) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ८ हजार ४३० रुपये रोख आणि पावती बुक जप्त करण्यात आले.

३३ हजारांहून अधिक रोकड जप्त

चार वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेल्या या संयुक्त कारवाईत एकूण आठ बुकींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ३३ हजार ८४० रुपयांची रोकड आणि जुगार-सट्टा चालविण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम

ही विशेष मोहीम जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार राबविण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे व प्रोबेशनरी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत दरेकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबल सचिन साळुंखे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून, पोलीस कॉन्स्टेबल आवेश शेख, प्रणय पवार, अमोल ठाकूर तसेच संबंधित पोलीस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT