जळगाव: गुन्ह्याचा तपास आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी मुंबईला गेलेल्या जळगाव पोलिसांचा एक संतापजनक 'प्रताप' समोर आला आहे. जळगाव एलसीबी आणि चाळीसगावच्या दोन कर्मचाऱ्यांनी चक्क मुंबईतील डान्सबारमध्ये ठुमके लगावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सरकारी खर्चाने तपासाच्या नावाखाली मौजमजा करणाऱ्या या 'कर्तव्यदक्ष' पोलिसांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जळगाव पोलिसांवर ताशेरे ओढले जात आहेत.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) महेश पाटील आणि चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे निलेश पाटील या दोघांची नावे समोर आली असून, त्यांना तडकाफडकी पोलीस मुख्यालयात (कंट्रोल) जमा करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी महेश पाटील आणि चाळीसगावचे निलेश पाटील हे मुंबईला तपासासाठी गेले होते. सरकारी कामासाठी बाहेर पडलेल्या या दोन्ही पोलिसांनी आणि मुबईच्या कर्मचारी यांनी गुन्ह्याचा तपास बाजूला ठेवून थेट डान्सबार गाठला. तिथे रात्रीच्या वेळी डान्सबारमध्ये मजा मारताना दिसून आले. दुर्दैवाने, त्यांचा हा 'कारनामा' कोणीतरी मोबाईलमध्ये कैद केला आणि तो व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला.
सरकारी पैशाची उधळपट्टी की तपासाची धुळफेक?
एकीकडे सर्वसामान्यांसाठी डान्सबार बंदीचे नियम आहेत, तर दुसरीकडे कायद्याचे रक्षकच डान्सबारमध्ये थिरकताना दिसत असल्याने संताप व्यक्त होत आहे. "कर्मचारी तपासाला जातात की सरकारी खात्याच्या नावाखाली मौज मस्ती करायला?" असा तिखट सवाल आता उपस्थित होत आहे. जनतेच्या कराच्या पैशातून पगार आणि भत्ता घेणारे पोलीस जेव्हा कर्तव्यावर असताना डान्सबारमध्ये रंगतात, तेव्हा साडे-लोटे कोणाचे? हा प्रश्न अनुत्तरित राहतो.
कारवाईचे सोपस्कार
व्हिडिओ व्हायरल होताच पोलीस दलात खळबळ उडाली. वरिष्ठांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोन्ही कर्मचाऱ्यांची प्राथमिक चौकशी केली आणि त्यांना तात्काळ कंट्रोलला जमा करण्याचे आदेश दिले. याबाबत अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, "प्रकरणाची चौकशी सुरू असून अधिक माहिती देता येणार नाही," असे मोघम उत्तर देण्यात आले.
'खाकी'ला डाग
जळगाव पोलीस दल आधीच विविध कारणांनी चर्चेत असते. त्यात आता कर्मचारीच अशा 'रंगेल' प्रकरणात सापडल्याने शिस्तीचे तीनतेरा वाजले आहेत. केवळ कंट्रोलला जमा करून भागणार नाही, तर अशा बेशिस्त कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई होणार का? याकडे आता जळगावकरांचे लक्ष लागले आहे.