जळगाव: जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या श्वान पथकातील कर्तबगार श्वान ‘जंजीर’ने सात वर्षांची उल्लेखनीय सेवा पूर्ण करून काल, ४ नोव्हेंबर रोजी सन्मानपूर्वक सेवा निवृत्ती घेतली. भावनिक वातावरणात पार पडलेल्या निरोप समारंभात जंजीरच्या योगदानाचा गौरव करण्यात आला. त्याचवेळी, नवीन श्वान ‘गुरू’चे उत्साहाने स्वागत करून त्याला सेवेत रुजू करण्यात आले आहे.
‘जंजीर’चा प्रवास
१८ नोव्हेंबर २०१७ रोजी जन्मलेल्या जंजीरने गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे नऊ महिन्यांचे विशेष प्रशिक्षण घेतले होते. ७ एप्रिल २०१८ पासून तो जळगाव जिल्हा पोलीस दलात कार्यरत होता. या काळात जंजीरने अनेक गुंतागुंतीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना महत्त्वपूर्ण मदत केली. चाळीसगाव, एमआयडीसी, भुसावळ शहर आदी पोलीस ठाण्यांतील तपासांत आरोपींचा मागोवा घेऊन जंजीरने अचूक मार्गदर्शन केले आहे.
निरोप समारंभात मान्यवरांची उपस्थिती
सेवा निवृत्ती समारंभाला जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी आणि अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. श्वान पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक देविदास वाघ, तसेच श्वान हस्तक पोहेकॉ. निलेश झोपे, पो.ना. प्रशांत कंकरे आणि पोहेकॉ. संदीप परदेशी यांनी जंजीरसोबतचे अनुभव सांगून त्याच्या सेवेसाठी कृतज्ञता व्यक्त केली.
‘गुरू’ची नवी जबाबदारी
जंजीरच्या निवृत्तीनंतर ‘गुरू’ या नव्या श्वानाची नियुक्ती करण्यात आली आहे. जंजीरने उभारलेला विश्वास आणि कामगिरीचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आता गुरूवर असेल. पोलिस प्रशासनाने आशा व्यक्त केली की, गुरू आपल्या प्रशिक्षणाच्या बळावर गुन्हेगारी तपासात जळगाव पोलिसांना प्रभावी साथ देईल. जळगाव पोलीस श्वान पथकाने आजवर गुन्हे उकलण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, आणि ‘गुरू’च्या रुजू झाल्याने या कार्यात आणखी बळ येणार आहे.