Ransom News  File Photo
जळगाव

Jalgaon Crime | मामा-भाच्याची सुखरूप सुटका; खंडणीसाठी अपहरणाचा डाव जळगाव पोलिसांनी उधळला

मुख्य सूत्रधारासह त्याच्या साथीदाराला अकोल्यातून ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon Police kidnapping for ransom

जळगाव: शहरात खळबळ उडवून देणाऱ्या मामा-भाच्याच्या अपहरण प्रकरणाचा जळगाव पोलिसांनी अत्यंत कौशल्याने आणि वेगाने तपास करून छडा लावला आहे. खंडणीसाठी करण्यात आलेले हे अपहरण उधळून लावत पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह त्याच्या साथीदाराला अकोल्यातून ताब्यात घेतले आहे.

काय होती घटना?

गोलाणी मार्केटमधील मोबाईल साहित्य विक्रेते कृष्णकुमार चौधरी आणि त्यांचा भाचा गणपतलाल माली यांना राजस्थानहून पार्सल आल्याचे खोटे सांगून बोलावण्यात आले होते. संशयित आरोपी यश माकोडे याने चाकूचा धाक दाखवून दोघांना ममुराबाद रोडवरील एका इमारतीत डांबले आणि त्यानंतर त्यांना अकोला येथे नेले. भाच्याची सुटका करण्यासाठी आरोपींनी २० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती.

पोलिसांची ‘ॲक्शन मोड’मध्ये कामगिरी

पीडित कृष्णकुमार चौधरी यांनी मध्यरात्री शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपबिती सांगितली. घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी तातडीने पोहेकाँ. अल्ताफ पठाण, प्रदीप नन्नवरे, योगेश जाधव आणि नवजीत चौधरी यांचे विशेष पथक रवाना केले.

या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनाही माहिती देण्यात आली, ज्यांनी तात्काळ उपनिरीक्षक सोपान गोरे व कर्मचाऱ्यांचे पथक मदतीसाठी पाठवले. या संयुक्त पथकाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तांत्रिक माहिती मिळवली आणि काही तासांतच अकोला गाठून संशयित आरोपी यश माकोडे व एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.

पोलिसांच्या या धाडसी आणि वेगवान कामगिरीमुळे गुन्हेगारांचे मनसुबे उधळले गेले असून, जळगाव पोलीस दलाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT