जळगाव : डिझेल चोरी करून अपघाताचा बनाव रचत पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. तब्बल २७०० किलोमीटरचा थरारक प्रवास करत एलसीबीच्या पथकाने राजस्थानच्या वाळवंटातून एका आरोपीला शिताफीने अटक केली, तर मुख्य सूत्रधाराची आलिशान कार जप्त केली आहे. पोलिसांच्या या 'सिंघम' स्टाईल कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
नेमका काय होता बनाव?
दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी एरंडोल-पारोळा रोडवरील हॉटेल आनंद परिसरात ही घटना घडली होती. टँकर चालक भूराराम काळूराम याने त्याच्या साथीदारांसह टँकरमधील २२ लाख रुपये किमतीचे ३० हजार लिटर डिझेल चोरले. ही चोरी लपवण्यासाठी त्यांनी टँकरचा अपघात झाल्याचा (Staged Accident) बनाव रचला होता. मात्र, संशय बळावल्याने पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी एलसीबीला समांतर तपासाचे आदेश दिले होते.
२७०० किमीचा पाठलाग आणि थरार!
एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय जितेंद्र वल्टे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण केले. आरोपींचे लोकेशन राजस्थानमधील बाडमेर येथे असल्याचे समजताच पथक तातडीने रवाना झाले. बाडमेरच्या बलदेव नगर भागात मुख्य आरोपी भूराराम याचा शोध घेत असताना पोलिसांची चाहूल लागताच तो आपली पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार (GJ-02-CG-0339) सोडून पसार झाला. ही कार गुन्ह्यातील पैशातून घेतल्याचा संशय असल्याने पोलिसांनी ती जप्त केली.
वाळवंटात घुसून 'रेड'
पथकाने आपला मोर्चा सिनधरी भागातील धुरियावास, होड्डु या वाळवंटी प्रदेशाकडे वळवला. जिथे साधे वाहनही पोहोचू शकत नाही, अशा ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला. तेथे लपून बसलेला दुसरा आरोपी अस्ला राम भोमाराम (वय ३२) याला पळून जात असताना पोलिसांनी शिताफीने पकडले.
गुन्हेगारी कट आणि कडक कलमे
आरोपींनी पूर्वनियोजित कट रचून चोरी केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी अपघाताचा बनाव रचला. त्यामुळे या गुन्ह्यात आता भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ६१(२) (गुन्हेगारी कट), ३०३(२) (वाहतूक साधनातून चोरी) आणि २३८ (पुरावा नष्ट करणे) ही कडक कलमे वाढवण्यात येणार आहेत.
तपासी पथकाचे कौतुक
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, डीवायएसपी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पीएसआय जितेंद्र वल्टे, संदीप पाटील, हरीलाल पाटील, प्रवीण मांडोळे, राहुल कोळी, दीपक चौधरी, गौरव पाटील आणि मिलिंद जाधव यांनी बजावली. आरोपीला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, पुढील तपास एरंडोल पोलीस करत आहेत.
पाळधी पोलिसांचा 'हाय व्होल्टेज' झटका! वीज तारा चोरणाऱ्या आंतरतालुका रॅकेटचा पर्दाफाश; १० लाखांचा मुद्देमाल जप्त
पिकअपसह मुख्य सूत्रधार जेरबंद, दोन विधीसंघर्षीत बालक ताब्यात; चोपडा, अडावद, जळगावात डल्ला मारल्याची कबुली
जळगाव: शेतकऱ्यांच्या शेतातील आणि सार्वजनिक ठिकाणच्या इलेक्ट्रिक पोलवरील ॲल्युमिनिअम तारा लंपास करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळधी दूरक्षेत्राच्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह दोन विधीसंघर्षीत बालकांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चोरीच्या तारा आणि गुन्ह्यात वापरलेली बोलेरो पिकअप असा एकूण १० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील वीज चोरट्यांचे धाबे दणाणले आहेत.
अंधाराचा फायदा घेऊन डल्ला, पोलिसांनी केला पाठलाग
मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वीज तार चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना पाळधी पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. सपोनि प्रशांत कंडारे आणि पीएसआय दत्तात्रय बडगुजर यांच्या पथकाने सापळा रचून आरोपींचा पाठलाग केला. या कारवाईत अजय बापू गायकवाड (रा. एरंडोल) याला अटक करण्यात आली असून दोन विधीसंघर्षीत बालकांना ताब्यात घेतले आहे. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन मनोज गायकवाड, सागर भील आणि भाईदास भील (सर्व रा. एरंडोल) हे फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
१०.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पोलिसांनी आरोपींकडून ४ लाख ५० हजार रुपये किमतीची इलेक्ट्रिक पोलवरील ॲल्युमिनिअम तार आणि चोरीचा माल वाहून नेण्यासाठी वापरलेली ६ लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप गाडी (क्र. एम.एच. ०४ जी.एफ. ४१७२) असा एकूण १० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आंतरतालुका रॅकेट उघड
अटक केलेल्या आरोपींची सखोल चौकशी केली असता, त्यांनी केवळ पाळधीच नव्हे तर चोपडा, अडावद, जळगाव तालुका या परिसरातही अशाच प्रकारे वीज तारा चोरल्याची कबुली दिली आहे. यामुळे जिल्ह्यात सक्रिय असलेले वीज तार चोरीचे एक मोठे रॅकेट उघड झाले असून, यामागे अजून कोणाचे हात आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप, पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रशांत कंडारे, पीएसआय दत्तात्रय बडगुजर, संघपाल तायडे, योगेश सोनवणे, मोहन पाटील यांच्या पथकाने केली. या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.