Jalgaon news 
जळगाव

Bike Theft Gang Arrested Jalgaon | दुचाकी चोरांची टोळी जेरबंद, 'भुरट्या' संघटित गुन्हेगारांना बसला जबरदस्त दणका

३ मोटारसायकलसह ३ आरोपींना ठोकल्या बेड्या; चाळीसगाव तालुक्यात उच्छाद मांडणाऱ्या टोळीवर 'बीएनएस' ११२ अंतर्गत मोठी कारवाई

पुढारी वृत्तसेवा

जळगाव: चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिवसाढवळ्या दुचाकी लंपास करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा मेहुणबारे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या जोरावर पोलिसांनी दोन मुख्य चोरट्यांसह चोरीची गाडी विकत घेणाऱ्यालाही बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीकडून एकूण ९० हजार रुपये किमतीच्या ३ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून, त्यांच्यावर 'भारतीय न्याय संहिता' (BNS) कलम ११२ नुसार संघटित गुन्हेगारीची कारवाई करण्यात आली आहे.

नेमके प्रकरण काय?

गेल्या ८ जानेवारी २०२६ रोजी दरेगाव आणि बरखेड परिसरातून दोन दुचाकी दिवसाढवळ्या चोरीला गेल्या होत्या. याप्रकरणी मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल होताच प्रभारी अधिकारी सपोनि प्रवीण दातरे यांनी विशेष पथक तयार केले होते. या पथकाने तपासाची चक्रे फिरवत आधी दडू संजय सोनवणे (१९, रा. दरेगाव, ता. मालेगाव) याला मालेगावातून शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या होत्या.

या गुन्ह्याचा तांत्रिक तपास सुरू असतानाच, सुलतान सलीम शाह (३४, रा. दहिवेल, ता. साक्री) हा मुख्य संशयित निष्पन्न झाला. पोलिसांनी ११ फेब्रुवारी रोजी त्याला दहिवेल येथून अटक करून ३ दिवसांची पोलीस कोठडी मिळवली. कसून चौकशी केली असता त्याने चोरीची गाडी विलास दत्तु पिंपळसे (३०, रा. औदाणे, ता. सटाणा) याला विकल्याची कबुली दिली. पोलिसांनी तातडीने औदाणे गाठून विलास पिंपळसेला अटक केली आणि त्याच्याकडून ३० हजार रुपये किमतीची 'हिरो एचएफ डिलक्स' गाडी हस्तगत केली.

भुरट्या चोरांवर 'संघटित गुन्हेगारी'चा शिक्का

तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली की, दादू सोनवणे, भगवान उर्फ लंगड्या करंगळ आणि सुलतान शाह या तिघांनी मिळून चाळीसगाव तालुक्यात संघटितपणे दुचाकी चोरीचे सत्र राबवले होते. त्यांच्या गुन्हेगारी रेकॉर्डची दखल घेत पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११२ अन्वये 'छोटे संघटित गुन्हे' (Small Organized Crime) म्हणून कारवाई केली आहे. या कारवाईमुळे परिसरात गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

यांनी केली कामगिरी

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रवीण दातरे, पीएसआय सुहास आव्हाड, पीएसआय विकास शिरोळे, पोहेकॉ मोहन सोनवणे, गोकूळ सोनवणे, पोना मिलींद कुमावत, पोकॉ विनोद बेलदार, राकेश काळे, प्रशांत खैरे यांनी ही यशस्वी कामगिरी बजावली. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय विकास शिरोळे आणि पोना मिलिंद कुमावत करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT