Jalgaon Peon Death Case Pudhari
जळगाव

Jalgaon Peon Death Case | खासगी फायनान्स अन् सावकारीच्या जाचातून शिपायाने संपवले जीवन?

वसुलीसाठी शिवीगाळ आणि धमकावल्याचा कुटुंबीयांचा आरोप; गुन्हे दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon Peon Death Case

जळगाव : खासगी फायनान्स कंपन्या आणि सावकारांकडून होणाऱ्या कथित छळाला कंटाळून जळगाव शहरातील चौबे हायस्कूलमध्ये शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या माधवराव देशमुख (उर्फ नंदू) यांनी जीवन संपविल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी मृताच्या नातेवाइकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जोपर्यंत संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देशमुख यांनी काही खासगी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतले होते. तसेच काही खासगी सावकारांकडूनही व्याजाने पैसे घेतल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून कर्जवसुलीसाठी घरी येणारे काही जण त्यांना अपमानित करत, धमकावत आणि शिवीगाळ करत असल्याचा आरोप त्यांच्या मुलाने केला आहे. या सततच्या त्रासाला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

खिशात नोट आढळली

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. देशमुख यांच्या खिशात नोट आढळल्याचे समजते. या चिठ्ठीत काही फायनान्स कंपन्या आणि कथित त्रास देणाऱ्या व्यक्तींची नावे नमूद असल्याची माहिती समोर आली आहे. या चिठ्ठीतील मजकूर आणि त्यातील आरोपांची पोलिसांकडून पडताळणी होणे आवश्यक आहे.

गुन्हे दाखल करण्याची मागणी

संबंधित फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी आणि संशयित सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी नातेवाइकांनी केली आहे. कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, सुसाईड नोटमधील मजकूर, कर्जवसुलीचे स्वरूप आणि छळाच्या आरोपांची चौकशी महत्त्वाची ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT