Jalgaon Murder : जुना वाद पेटला अन् मित्रानेच केला मित्राचा 'गेम'; पारोळा हादरला! 
जळगाव

Jalgaon Murder : जुना वाद पेटला अन् मित्रानेच केला मित्राचा 'गेम'; पारोळा हादरला!

पळसखेडे बुद्रुक शिवारात थरार; पोटात चाकू खुपसून मयूर पाटीलची हत्या, आरोपी अंकुश पाटील पसार

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : एकाच गल्लीत राहणाऱ्या दोन मित्रांमधील जुना वाद अखेर जिवावर बेतला असून, किरकोळ कारणावरून झालेल्या बाचाबाचीत एकाने थेट मित्राच्याच पोटात चाकू खुपसून त्याचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली. पारोळा तालुक्यातील पळसखेडे बुद्रुक शिवारात गुरुवारी (दि. १०) दुपारी ही रक्ताळलेली घटना घडली असून, मयूर दुर्वास पाटील (रा. पळसखेडे बु.) असे मृत तरुणाचे नाव आहे. या थरारक घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मयूर पाटील आणि आरोपी अंकुश नेहरू पाटील हे दोघेही पळसखेडे बुद्रुक येथील एकाच भागात राहणारे असून त्यांच्यात पूर्वीपासून वाद सुरू होता. गुरुवारी दुपारी ३ ते ४ वाजेच्या सुमारास पळसखेडे शिवारातील रवींद्र सुकदेव पाटील यांच्या शेताजवळ दोघे समोरासमोर आले. तिथे जुन्या वादावरून दोघांमध्ये पुन्हा जोरदार वादावादी आणि शिवीगाळ झाली. हा वाद विकोपाला जाताच रागाच्या भरात अंकुश नेहरू पाटील याने आपल्या पॅन्टच्या डाव्या खिशातून धारदार चाकू काढून थेट मयूरच्या पोटात खुपसला.

या अचानक झालेल्या प्राणघातक हल्ल्यात मयूर पाटील गंभीर जखमी होऊन जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. भरदिवसा घडलेल्या या खुनाच्या घटनेने पळसखेडे परिसरात एकच थरकाप उडाला.

या प्रकरणी मयूरचे वडील बाळू उर्फ दुर्वास भिका पाटील (वय ४५, रा. पळसखेडे बु.) यांनी पारोळा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अंकुश नेहरू पाटील याच्याविरुद्ध भा.न्या.सं. कलम १०३(१), ११५(२), ३५२, ३५१(२) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या गावात परिस्थिती नियंत्रणात असून शांतता आहे. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक योगेश महाजन या प्रकरणाचा पुढील तपास करत असून पसार आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT