पारोळा येथे ग्रामविस्तार अधिकाऱ्याला १ लाखाची लाच घेताना अटक करण्यात आली.  Pudhari File Photo
जळगाव

पारोळा येथे ग्रामविस्तार अधिकारी १ लाखाची लाच घेताना 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

पुढारी वृत्तसेवा

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत धुळ पिंप्री (ता. पारोळा) येथे काँक्रिट व पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामासाठी ६० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाची वर्क ऑर्डर काढण्यासाठी १ लाखाची लाच घेताना सहायक कार्यक्रम अधिकारी यांना रंगेहाथ पकडण्यात आले. संगनमताने लाच घेण्यात आल्याने ग्रामविस्तार अधिकारी आणि सहायक कार्यक्रम अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज (दि.२०) केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, धुळ पिंप्री गावातील ग्रामपंचायत येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत काँक्रिट व पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामासाठी ६० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाची वर्क ऑर्डर काढण्यासाठी १ लाख ८० हजार लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी सरपंचांच्या मुलाने तक्रार दिली होती. या तक्रारीची पडताळणी केली असता पारोळा पंचायत समितीचे ग्रामपंचायत विभागाचे ग्रामविस्तार अधिकारी सुनिल अमृत पाटील (वय ५८) यांनी सहायक कार्यक्रम अधिकारी कल्पेश ज्ञानेश्वर बेलदार (वय २८) यांना लाच घेण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. ही लाच पंचासमक्ष तडजोडअंती एक लाख स्वीकारताना कल्पेश बेलदार याला रंगेहाथ पकडण्यात आले. दोघांवर पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक नैत्रा जाधव, पोलीस निरीक्षक, स्मिता नवघरे, सुनिल वानखेडे, किशोर महाजन, बाळू मराठे, सुरेश पाटील, रविंद्र घुगे, शैला धनगर, प्रदीप पोळ, प्रणेश ठाकूर, सचिन चाटे यांनी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT