Gutka Seized Parola  AI
जळगाव

FDA Raid Jalgaon | पारोळ्यात धडक कारवाई; १.८६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, आरोपीविरुद्ध गुन्हा

म्हसवे शिवारातील तलाठी कॉलनी परिसरात कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Gutka Seized Parola

जळगाव : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पारोळ्यात मोठी कारवाई केली आहे. म्हसवे शिवारातील तलाठी कॉलनी परिसरात टाकलेल्या छाप्यात तब्बल १ लाख ८६ हजार ९१४ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी एका संशयिताविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे.

अन्न व औषध प्रशासनाला पारोळा शहरातील म्हसवे शिवारातील तलाठी कॉलनी येथे प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे बुधवारी ( दि. १०) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास प्रशासनाच्या पथकाने संबंधित ठिकाणी धाड टाकली.

छाप्यादरम्यान घरामध्ये पांढऱ्या रंगाच्या पोत्यांमध्ये लपवून ठेवलेला प्रतिबंधित गुटखा आढळून आला. तपासणीनंतर या साठ्याची एकूण किंमत १ लाख ८६ हजार ९१४ रुपये असल्याचे निष्पन्न झाले. संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी शरद मधुकर पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कैलास गणेश चौधरी (रा. तलाठी कॉलनी, पारोळा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान आरोपी घटनास्थळी आढळून न आल्याने तो फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

महाराष्ट्र शासनाच्या अन्न सुरक्षा आयुक्तांनी १६ जुलै २०२५ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार राज्यात सुगंधित पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक २१४/२०२६ नुसार पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे पारोळा शहरासह परिसरात प्रतिबंधित गुटखा विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून अशा अवैध व्यवसायांवर प्रशासनाची करडी नजर असल्याचा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश महाजन करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT