Minor girl assaulted  Pudhari
जळगाव

Jalgaon Crime | पारोळा तालुक्यात १३ वर्षीय मुलीचा विनयभंग; नराधम आरोपीला अटक

पारोळा तालुक्यातील गजानन पळासखेडा गावात खळबळ

पुढारी वृत्तसेवा

Parola Minor Girl assaulted

जळगाव : आई-वडील घरी नसताना १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा घरात घुसून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना पारोळा तालुक्यातील गजानन पळासखेडा गावात घडली आहे. नात्याने काका असलेल्या नराधम नातेवाईकानेच हे कृत्य केले असून, याप्रकरणी पारोळा पोलिसात 'पोक्सो'सह नवीन भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत.

आनंदा त्र्यंबक शिंदे असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

घरात एकटी पाहून कृत्य

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३१ मे रोजी पहाटेच्या सुमारास पीडित मुलीचे आई-वडील शेतात काम करण्यासाठी गेले होते, तर आई संशयित आरोपी आनंदा शिंदे याच्याच घरी एका लग्नकार्यासाठी गेली होती. सकाळी ८ वाजेच्या सुमारास मुलगी घरात एकटीच नाश्ता करत असल्याचे पाहून आरोपी आनंदा शिंदे याने घरात प्रवेश केला. "आई-वडील कुठे आहेत?" अशी चौकशी करून मुलगी एकटी असल्याची खात्री पटताच त्याने मुलीचा हात धरून तिला बळजबरीने स्वयंपाकघरात ओढले. तिथे तिच्याशी अश्लील वर्तन करत विनयभंग केला व घाणेरडी वक्तव्ये केली. पीडितेने कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली आणि घराच्या मागच्या दाराने थेट आजीच्या घरी पळ काढला.

'कोणाला सांगितले तर जिवंत मारून टाकेन'; नराधमाची धमकी

घटना घडल्यानंतर आरोपी आनंदा याने, "याबाबत कोणाला काही सांगितले तर तुला जिवंत मारून टाकेन," अशी धमकी दिली. या धमकीमुळे अल्पवयीन मुलगी प्रचंड मानसिक दडपणाखाली आली होती. तिने दोन दिवस कोणाशीही संवाद साधला नाही, जेवण बंद केले आणि ती रात्री झोपेतून दचकून उठत होती. मुलीच्या या बदललेल्या वर्तनामुळे आई-वडिलांना संशय आला. २ जून रोजी सकाळी त्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, तिने रडत रडत तिच्यासोबत घडलेला हा सर्व प्रसंग सांगितला.

'पोक्सो'सह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल

घटनेचे गांभीर्य ओळखून पालकांनी तात्काळ पारोळा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपी आनंदा त्र्यंबक शिंदे याच्याविरुद्ध तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारोळा पोलिसांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवत संशयित आरोपी आनंदा शिंदे याला तात्काळ अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय भोंबे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT