जळगाव: थंडीचा फायदा घेत जिल्हयात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. गुरुवारी (दि. २३) एकाच दिवशी जळगाव शहरातील ममुराबाद रोड आणि धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे घरफोडीच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. चोरट्यांनी बंद घरांचे कडी-कोंडे तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण १ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांच्या रात्रगस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
जळगाव शहरातील ममुराबाद रोडवरील सिकवाल नगरात राहणारे अमित राजेश माळी (वय ३२) हे खासगी नोकरी करतात. २२ जानेवारीच्या रात्री ते घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. ही संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाट उचकटून त्यातील ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी (किंमत ३९,०००) आणि ७ ग्रॅम वजनाची चांदीची पुष्कराज खडा असलेली अंगठी (किंमत १७,०००) असा एकूण ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस नाईक नरेंद्र पाटील करीत आहेत.
पाळधीत सव्वा लाखांवर मारला डल्ला
दुसरी घटना पाळधी (ता. धरणगाव) येथील गोविंद नगरात घडली. येथील रिक्षाचालक सय्यद अरमान सय्यद कुरबान (वय ६२) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून चोरट्यांनी ३ सोन्याचे तुकडे, २ जोड कानातील सोन्याच्या रिंगा, १ तोळ्याचे मंगळसूत्र आणि २५ हजार रुपये रोख असा एकूण १ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना २३ जानेवारीला पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय बडगुजर करीत आहेत.
एकाच रात्रीत दोन ठिकाणी धाडसी घरफोड्या झाल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.