जळगाव : मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या पाळधी-तरसोद बायपासवर शुक्रवारी पुन्हा एकदा भीषण दुर्घटना घडली. पाळधी गावाजवळील रेल्वे उड्डाणपुलावरील रस्त्याचा आणि पुलाच्या भरावाचा मोठा भाग अचानक खचून कोसळला. यावेळी पुलावर काम सुरू असलेली अवजड क्रेन थेट खाली कोसळल्याने क्रेनचालक मधुकर धनराज पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. अवघ्या अडीच महिन्यांत या बायपासवर दुसरी मोठी दुर्घटना घडल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) कामाच्या दर्जाबाबत आणि सुरक्षाव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
पाळधीकडून तरसोदच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावर काम सुरू असताना अचानक रस्त्याचा मोठा भाग खचला. पुलाचा भराव आणि रस्त्याचा भाग कोसळल्याने त्यावर काम करणाऱ्या अवजड क्रेनचा तोल गेला. त्यानंतर क्रेन थेट पुलावरून खाली कोसळली. या घटनेचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, क्रेनखाली दबून चालक मधुकर धनराज पाटील यांचा मृत्यू झाला.
काही दिवसांपूर्वी याच बायपासवरील तरसोदकडून पाळधीकडे जाणाऱ्या मार्गावर आसोदा गावाजवळ रेल्वे उड्डाणपुलाच्या एका बाजूचा भराव खचून वाहून गेल्याची घटना घडली होती. या ठिकाणी अद्याप दुरुस्तीचे काम सुरू असतानाच आता पाळधीजवळ दुसरी दुर्घटना घडली आहे. यावेळी रस्त्यासह पुलाचा भाग कोसळल्याने क्रेनचालकाला जीव गमवावा लागला.
अवघ्या अडीच महिन्यांच्या अंतराने घडलेल्या या दोन घटनांमुळे बायपासवरील उड्डाणपुलांच्या बांधकामाचा दर्जा आणि सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेला महामार्ग वाहनधारकांसाठी सुरक्षित प्रवासाचा मार्ग ठरण्याऐवजी मृत्यूचा सापळा बनत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. पुलाच्या भरावाच्या दर्जाबाबत, बांधकामातील संभाव्य त्रुटी आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या संबंधित अधिकारी आणि ठेकेदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही पुढे येत आहे.
ही दुर्घटना दुपारी चारच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, घटनेनंतर पाच तास उलटूनही मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आला नसल्याची माहिती समोर आली. यामुळे दुर्घटनेनंतरच्या बचावकार्याबाबत आणि प्रशासकीय समन्वयाबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. या घटनेची माहिती घेण्यासाठी पाळधी आऊट पोस्टशी संपर्क साधला असता, संबंधित ठाणे अंमलदारांनी दुर्घटनेबाबत अधिकृत सूचना प्राप्त झालेली नसल्याचे सांगितले. मात्र, अपघात झाल्याची माहिती कानावर आल्याचे त्यांनी नमूद केले. याबाबत अधिकृत माहिती देण्यास त्यांनी असमर्थता दर्शविली.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी दुर्घटना घडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. तसेच, या प्रकरणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या संबंधित अधिकारी आणि अभियंत्यांना कठोर शब्दांत सूचना देऊन कारवाईचे आदेश दिल्याचे सांगितले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी श्री. साळुंखे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, सुमारे अर्धा तास त्यांचा दूरध्वनी व्यस्त असल्याने संपर्क होऊ शकला नाही. घटनास्थळी गेलेल्या स्थानिक माध्यमांच्या प्रतिनिधींनी दुर्घटनेची छायाचित्रे आणि संबंधित माहिती प्रशासनाला दिल्याचेही समजते. पाळधी-तरसोद बायपासवरील सलग दुर्घटनांमुळे महामार्गाच्या बांधकामाच्या गुणवत्तेची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.