जळगाव : रावेर या ठिकाणी कॉल सेंटरद्वारे ग्राहकांना प्रलोभने देऊन ऑनलाईन बेटिंग द्वारा जुगार खेळणाऱ्यांवर रावेर पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये सहा जणांना अटक करण्यात आली असून एक लाख 15 हजार रुपये व ऑनलाईन गेमिंगचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. रावेर पोलिसात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
या वेबसाईटवरुन व्हायचा ऑनलाईनचा बाजार
www.wood777.com या वेबसाईटवर व्हाट्सअँप द्वारे लिंक पाठवून लोकांना वेगवेगळे ऑनलाईन जुगार खेळाकरीता प्रोत्साहन देत होते. आरोपींकडून 9 मोबाईल फोन, 2 लॅपटॉप, 1 लॅपटॉपचे चार्जर, 1 एक्सटेंशन बोर्ड असा एकूण 1लाख 15 हजार 700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 1887 चे कलम 4, 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार.मंगळवार (दि. 24) रोजी पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना गुप्त माहिती मिळाली की, रावेर येथील सुमन नगर, रेल्वे स्टेशन रोड या ठिकाणी दत्तू दिगंबर कोळी याच्या राहत्या घरात मोबाईल व लॅपटॉपच्या साह्याने ऑनलाइन गेम ॲप तयार करून नागरिकांना विविध प्रलोभने दाखवून त्यावर पैशांची हार-जीतचा खेळ सुरू आहे.
या माहितीच्या आधारे पोलीस अधिक्षक, महेश्वर रेड्डी, जळगाव, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधिक्षक अन्नपुर्णा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव, पोलीस हेड काॅन्सटेबल रविंद्र वंजारी, सुनिल वंजारी, सचिन घुगे, विशाल पाटील, प्रमोद पाटील, महेश मोगरे, समाधान ठाकुर, संभाजी बिजागरे, श्रीकांत चव्हाण यांनी याठिकाणी छापा टाकला.
अभिषेक अनिल बानिक (वय.19 रा. मनिषनगर नागपूर) साहिल खान व वकिल खान (वय.22 रा. पन्हाना ता पन्हाना जि. खंडवा (म.प्र)) बलविर रघुविर सोलंकी (वय. 22 रा. जावल ता.जि. खंडवा (म.प्र)), अंकित धर्मेंद्र चव्हाण (वय.19 रा. पन्हाना ता. पन्हाना जि. खंडवा (म.प्र)), साहिद खान जाकिर खान (वय. 19 रा. खडकवाणी ता. कसरावद जि. खंडवा (म.प्र), गणेश संतोष कोसल (वय.25 रा. पन्हाना ता. पन्हाना जि. खंडवा (म.प्र) असे आरोपी या गुन्ह्यात दाखल आहेत.