जळगाव : येथील नशिराबाद उड्डाणपुलावर दुचाकीवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात जुळ्या भावांपैकी एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी आहे. या अपघातात चैतन्य सुपडू फेगडे (रा. निंभोरा, ता. रावेर) याचा मृत्यू झाला.
चैतन्य आणि त्याचा जुळा भाऊ चेतन फेगडे आई-वडिलांसोबत घरकुल योजनेच्या कामानिमित्त जळगावला जात होते. वडील रिक्षाने पुढे निघाले, तर दोन्ही भाऊ दुचाकी (क्र. MH 19 EE 1702) घेऊन निघाले होते. नशिराबाद गावाजवळील उड्डाणपुलावर दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी दुभाजकाला धडकली. या अपघातात चैतन्यचा जागीच मृत्यू झाला, तर चेतन मात्र गंभीर जखमी झाला आहे.
गंभीर जखमी चेतन फेगडेला तातडीने जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयत चैतन्य एक वर्षापूर्वी रेल्वे विभागात नोकरीला लागला होता. या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.