जळगाव : जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्र ठेवणाऱ्या किंवा विक्री करणाऱ्या अशा आरोपींना जळगाव जिल्ह्यातील पोलिसांनी ताब्यात घेऊन नोव्हेंबर अखेर 100 पिस्तूल व रिवाॅल्वर जप्त केले आहेत. याप्रकरणी 98 आरोपींकडून 25 लाख 98 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्र खरेदी-विक्री होत असल्याचे पोलीस प्रशासनाने केलेल्या कारवाईवरून दिसून येत आहे. सातपुडा पर्वत तसेच मध्य प्रदेशाला लागून आहे. त्यामुळे अवैध शस्त्र विक्री करणाऱ्यांना या मार्गाने खुला मार्ग मिळतो. मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्याच्या बॉर्डर असलेल्या लहान उमर्टी व मोठ्या उमर्टी या ठिकाणी अवैध शस्त्र निर्माण करण्याचे काम होते. याच ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील चोपडा मार्गे, यावल मार्गे अशा विविध मार्गाने अवैध शस्त्रांची आवकजावक होत असते. जळगाव जिल्ह्यातील पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आलेल्या कारवाईमध्ये गेल्या 11 महिन्यांमध्ये एकूण 63 केसेस नोंदविण्यात आलेले आहेत. या कारवाईमध्ये शंभर पिस्तूल व रिवाॅल्वर असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. 166 काडतूस असे एकूण 25 लाख 98 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे. या प्रकरणी 1 जानेवारी 2024 ते 31 नोव्हेंबर 2024 या कालावधीत 98 आरोपींकडून 25 लाख 98 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेण्यात आला आहे.