जळगाव: नारळी पौर्णिमेच्याच दिवशी नियतीने अत्यंत क्रूर घाला घातल्याची हृदयद्रावक घटना भुसावळ शहरात घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास वीज पुरवठ्यातील बिघाड दुरुस्त करत असताना विजेचा तीव्र धक्का लागून महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ वैभव पुरुषोत्तम दांडेकर (वय ३५, रा. गोरक्षण संस्था, जामनेर रोड, भुसावळ) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रक्षाबंधनाचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना, तीन बहिणींच्या पाठीवरचा एकुलता एक भाऊ आणि घरातील कर्ता पुरुष हिरावला गेल्याने दांडेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
गांधी पुतळा चौकातील डीपीवर दुरुस्तीदरम्यान अपघात
मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, २६ ऑगस्टच्या मध्यरात्री (२७ ऑगस्ट रोजी ००:०० ते ०८:०० ड्युटी दरम्यान) तापी नगर व परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. महावितरणचे कर्मचारी अजय निवृत्ती चौधरी, दीपक लिधुरे आणि वैभव दांडेकर हे तिघे डीएस ग्राऊंड परिसरात गस्त घालत असताना ग्राहकांची तक्रार प्राप्त झाली. त्यानुसार रात्री १ वाजेच्या सुमारास गांधी पुतळा चौकातील पेट्रोल पंपासमोर असलेल्या डीएस कॉम्प्लेक्सजवळील ११ केव्ही कट पॉईंट खांबावरील फॉल्ट तपासण्यासाठी वैभव दांडेकर हे इमारतीच्या वरच्या मजल्यावर गेले. त्यांच्यामागे अजय चौधरी जात असतानाच अचानक वैभव दांडेकर यांना विजेचा जोरदार धक्का बसून मोठा आवाज झाला.
सहकाऱ्यांनी तातडीने सहाय्यक अभियंता अजय गावंडे यांना कळवले. गावंडे यांनी आपल्या खाजगी गाडीतून जखमी वैभव दांडेकर यांना भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले; मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अजय चौधरी यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सुबोध मोरे करत आहेत.
आईच्या वर्षाश्राद्धानंतर आठवड्यातच कर्त्या पुरुषाची एक्झिट
विशेष म्हणजे, अवघ्या आठवड्याभरापूर्वीच वैभव यांनी आपल्या दिवंगत आईचे वर्षाश्राद्ध पार पाडले होते. आईच्या विरहाचे दुःख ताजे असतानाच या दुर्दैवी घटनेने संपूर्ण कुटुंबाचा आधारच हिरावून घेतला आहे. त्यांच्या पश्चात वृद्ध वडील, पत्नी, दीड वर्षाचा मुलगा, चार ते पाच वर्षांची लहान मुलगी आणि तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे. तीन बहिणींच्या पाठीवर असलेला एकमेव भाऊ अशाप्रकारे अचानक निघून गेल्याने भावाच्या पाठीवर राखी बांधण्यासाठी आसुसलेल्या बहिणींवर आभाळच कोसळले आहे.
नियमानुसार कुटुंबाला मदत करणार: महावितरण
या घटनेबाबत महावितरणचे भुसावळ विभाग अभियंता दातूनवाला यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, "ब्रेकडाऊनचे काम करत असताना ही दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. महावितरणतर्फे कर्मचाऱ्यांना आवश्यक असणारे सर्व सुरक्षेचे साहित्य पुरवण्यात आले होते आणि तशा अधिकृत नोंदीही उपलब्ध आहेत. कंपनीच्या नियमानुसार दांडेकर यांच्या परिवाराला जी काही शक्य असेल ती संपूर्ण मदत तात्काळ करण्यात येईल." दरम्यान, अभियंता दातूनवाला यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून तो मंजूर झाला असल्याची माहितीही समोर आली आहे.