जिल्ह्यातील अकरा विधानसभेच्या जागावाटपात युतीने आघाडी घेत आपल्या संपूर्ण जागा जाहीर केल्या आहेत. उमेदवारी जाहीर झाल्या आहेत, प्रचाराचे नारळी फुटत आहेत तर दुसरीकडे आघाडी मात्र पिछाडीवर राहिली आहे. यामध्ये आघाडीतील घटक पक्षांना काँग्रेस तीन उबाठा चार राष्ट्रवादी शरद पवार तीन अशा जागा मिळालेल्या असून अजूनही एरंडोल या विधानसभा क्षेत्रावरील निर्णय व उमेदवार जाहीर होणे बाकी आहे.
जळगाव जिल्ह्यातील अकरा विधानसभा क्षेत्रांवर विद्यमान युती सरकारमधील जे उमेदवार आमदार किंवा नामदार आहेत. त्यांनाच पुन्हा संधी देण्यात आली. यामध्ये एक एरंडोल व रावेर हे दोन विधानसभा क्षेत्र सोडल्यास बाकी सर्व जैसे थे उमेदवार आहेत. एरंडोल मध्ये विद्यमान आमदारांचे सुपुत्र अमोल चिमणराव पाटील यांना संधी दिली आहे. तर रावेर मधून हरिभाऊ जावळे यांचे सुपुत्र अमोल जावळे यांना संधी देण्यात आलेली आहे.(Maharashtra assembly poll)
युतीने आपली प्रचारातही आघाडी घेतली. मात्र युतीला आव्हान देणाऱ्या आघाडीने जळगाव जिल्ह्यात अजूनही काही ठिकाणी आपले उमेदवार जाहीर केलेले नाही. आघाडीतील काँग्रेस पक्षाला भुसावळ रावेर व अंमळनेर ही तीन विधानसभा क्षेत्र मिळाली आहेत. रावेरमध्ये त्यांचे विद्यमान आमदार आहेत. विद्यमान आमदारांच्या जागी त्यांच्या सुपुत्रांना काँग्रेसने संधी दिली आहे. तर दुसरीकडे भुसावळ. ज्या ठिकाणी बोटावर मोजण्या इतके कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी काँग्रेस उमेदवार देत आहेत. भुसावळ या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व उबाठा यांच्या कार्यकर्त्यांची एक फळी आहे. मात्र काँग्रेसचे तेच जुने चेहरे या ठिकाणी आहेत.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला पाचोरा, चाळीसगाव, जळगाव शहर आणि चोपडा या ठिकाणी विधानसभा क्षेत्र मिळाले आहे. या ठिकाणी पूर्वी शिवसेनेची मोठ्या प्रमाणात ताकद होती. मात्र शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर शिंदे गट व ठाकरे गट अशा दोन गटात शिवसेनेची ताकद विभागली गेलेली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांना जळगाव ग्रामीण, जामनेर, मुक्ताईनगर ही तीन विधानसभा क्षेत्र मिळाली आहेत. जळगाव ग्रामीण यामध्ये आदी माजी पालकमंत्र्यांमध्ये काट्याची टक्कर होऊ शकते.कारण याच मतदारसंघातून गुलाबराव देवकर विजय होऊन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री झाले होते. मुक्ताईनगर जो भाजपाचा बालेकिल्ला होता व विद्यमान राष्ट्रवादीच्या उमेदवार रोहिणी खडसे या भाजपाच्या गेल्या वेळेस उमेदवार होत्या.आता त्यांनी शिवसेनेच्या आमदारांनाच आव्हान दिले आहे. मुक्ताईनगर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराने नेहमीच गिरीश महाजन यांना काट्याची टक्कर दिलेली आहे. यावेळेसही गिरीश महाजन यांच्या जवळचे दिलीप खोपडे यांना संधी मिळाली आहे. त्यामुळे मराठा वोटिंग यावेळेस महत्त्वाचे ठरणार आहे.(Maharashtra assembly poll)
या अकरा विधानसभेमधील एरंडोल विधानसभा कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत एरंडोल विधानसभेमध्ये शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पालकमंत्री डॉक्टर सतीश पाटील यांची अजूनही उमेदवारी जाहीर झालेली नाही.आता हा मतदारसंघ कोणाला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.