जळगाव : एस.एन.डी.टी. विद्यापीठ, मुंबई व गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. वर्षा पाटील वुमन्स महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठस्तरीय अंतर-महाविद्यालयीन भव्य क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा ८ ते १० ऑक्टोबर २०२५ दरम्यान गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज आणि एकलव्य क्रीडा संकुल, जळगाव येथे पार पडणार आहे. देशभरातील ३० पेक्षा अधिक महाविद्यालयांचा सहभाग या स्पर्धेत असून, महाराष्ट्र, गुजरात, नोएडा, केरळ येथून आलेल्या ४०० ते ४५० विद्यार्थिनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होणार आहेत.
या स्पर्धांमध्ये व्हॉलीबॉल, टग ऑफ वॉर, तायक्वांदो, अॅथलेटिक्समध्ये १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर, थाळीफेक, गोळाफेक, उंच उडी व लांब उडी या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. प्रत्येक स्पर्धेसाठी प्रशिक्षित पंच व प्रशिक्षकांची व्यवस्था करण्यात आली आहे. खेळाडूंसाठी प्राथमिक उपचारासाठी डॉक्टरांचे पथक, तसेच आपत्कालीन सेवेसाठी अॅम्ब्युलन्स देखील तैनात असणार आहे.
स्पर्धेच्या अंतिम दिवशी, १० ऑक्टोबर २०२५ रोजी समारोप समारंभ होणार असून विजेत्या खेळाडूंना प्रमाणपत्रे व ट्रॉफीने गौरविण्यात येणार आहे. याचबरोबर, स्पर्धेचे थेट प्रक्षेपण युट्यूब आणि अधिकृत संकेतस्थळावर करण्यात येणार आहे, जेणेकरून देशभरातून प्रेक्षक या क्रीडा महोत्सवाचा अनुभव घेऊ शकणार आहेत.