Temple Theft Pudhari
जळगाव

Temple Theft Jalgon : सातपुड्यातील कुलदैवत मनुदेवी मंदिरात चोरी; १ लाख ३५ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

भाविकांच्या श्रद्धेच्या ठिकाणी झालेल्या या चोरीमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : उत्तर महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सातपुड्याच्या कुशीतील प्रसिद्ध श्री मनुदेवी माता मंदिरात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून मनुदेवी माता आणि रेणुका मातेच्या मूर्तींवरील १ लाख ३५ हजार रुपये मूल्याचे चांदीचे मुकुट आणि छत्र्या लांबवल्या आहेत. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ६ ऑगस्टच्या सायंकाळी ५:३० ते ७ ऑगस्टच्या सकाळी ७:०० वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. अज्ञात चोरट्याने मंदिराच्या मुख्य चॅनेल गेटचे तसेच गाभाऱ्याच्या लाकडी दरवाजाचे कडी-कोंडे तोडून मंदिरात अनधिकृत प्रवेश केला. गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर चोरट्याने मातांच्या मूर्तींवरील दागिन्यांवर हात साफ केला.

मनुदेवी माता मूर्तीवरील चांदीचा मुकुट: वजन ३०० ग्रॅम किंमत रु. ४०हजार ५००

मनुदेवी माता मूर्तीवरील चांदीची छत्री: वजन २०० ग्रॅम किंमत रु. २७ हजार

रेणुका माता मूर्तीवरील चांदीचा मुकुट: वजन ३०० ग्रॅम किंमत रु. ४०हजार ५००

रेणुका माता मूर्तीवरील चांदीची छत्री: वजन २०० ग्रॅम किंमत रु. २७ हजार असे एकूण मुद्देमाल: १ लाख ३५ हजार रुपये मुद्देमाल लंपास केला आहे.

सकाळी मंदिर उघडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी यावल तालुक्यातील आडगाव येथील रहिवासी व शेतकरी शिवाजी प्रभाकर पाटील (वय ५१) यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदणी क्र. २९०/२०२६ नुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध बीएनएस (BNS) कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५(डी) अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे स्वतः करत असून, चोरट्यांचा माग काढण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. भाविकांच्या श्रद्धेच्या ठिकाणी झालेल्या या चोरीमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT