जोरदार पावसामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पाण्याचे मोठे डबके साचल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाला तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. Pudhari News Network
जळगाव

Jalgaon News : जिल्हाधिकारी कार्यालयाला आले तलावाचे स्वरूप

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दौऱ्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाची तारांबळ

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात गुरुवार (दि.14) रात्रीपासून झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पाण्याचे मोठे डबके साचल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाला तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. कार्यालयातील पार्किंग व प्रवेशद्वाराजवळही पाणी साचल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाची (PWD) मोठी तारांबळ उडालेली पहावयास मिळत आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार रविवार (दि.17) रोजी जळगाव दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीपूर्वीच परिसर पाण्याखाली गेलेला पहावयास मिळत आहे. त्यामुळे सकाळपासून जेसीबीच्या सहाय्याने पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नगरपालिका आणि खाजगी जेसीबींच्या मदतीने पाणी काढण्याचे प्रयत्न होत आहे. अखेर व्हॅक्यूम मशीन बोलावून पाण्याचा उपसा करण्यात आला.

पाणी निचरा व्यवस्थेचा अभाव

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेरील रस्ता सिमेंट काँक्रीट करण्यात आलेला असला, तरी योग्य निचरा व्यवस्था झाली नसल्याने पावसाचे पाणी थेट कार्यालय परिसरात शिरते आहे. प्रत्येक पावसाळ्यात हीच स्थिती उद्भवत आहे, मात्र याकडे प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष होत आहे. यंदा उपमुख्यमंत्री अजित पवारांचा दौरा असल्याने पाणी साचलेले दिसू नये म्हणून PWD अधिकाऱ्यांना दिवसभर धावपळ करावी लागली.

उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत रविवार (दि.17) रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक होणार आहे. त्यामुळे सभागृह, अधिकाऱ्यांची दालने, तसेच जिल्हा नियोजन भवन परिसरात स्वच्छतेचे काम करण्यात आली. परिसर अधिक आकर्षक व हिरवागार दिसावा यासाठी बाहेरून झाडांची कुंड्या मागवण्यात आल्या आहेत.

राष्ट्रवादीत बदलाचे संकेत

अजित पवार यांच्या या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) संघटनेत मोठे बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. जिल्हाध्यक्ष पदासह खालच्या स्तरावरील पदाधिकाऱ्यांमध्ये देखील मोठे फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT